होली मिलन कार्यक्रमात यंदा सहभागी होणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी; कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

जगभरात दहशत पसरवणारा कोरोना व्हायरस (Corona Virus) आता भारतामध्ये दाखल झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच दिल्ली, हैद्राबाद येथे कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सुरक्षितता बाळगणे महत्त्वाचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदा होली मिलन कार्यक्रमात (Holi Milan programme) मोदी सहभागी होणार नसल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (कोरोना व्हायरस पासून बचावासाठी काय तयारी करावी सांगणारा सिंगापूरच्या पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांना सल्ला)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खूप लोकांनी एकत्र येणे टाळायला हवे, असा सल्ला जगभरातील तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मी यंदा होली मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

नरेंद्र मोदी ट्विट:

कोरोना व्हायरसमुळे पसरत असलेली भीती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असा सल्ला दिला होता. तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात पसरु नये यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी भारत सरकारने नवी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार  इटली, जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान या देशातील नागरिकांना 3 मार्च किंवा त्यानंतर देण्यात आलेला व्हिसा  किंवा ई-व्हिसा रद्द करण्यात आला आहे.