Coronavirus: भारतामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव नोव्हेंबरमध्येच झाला होता? हैद्राबादच्या शास्त्रज्ञांचा दावा, सापडला नवीन स्ट्रेन
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

30 जानेवारी रोजी केरळमध्ये भारतातील कोरोना विषाणूची (Coronavirus) पहिली घटना समोर आली. त्यानंतर हळू हळू हा विषाणू भारतभर पसरला. मात्र कोविड-19 ने नोव्हेंबर ते डिसेंबर या काळातच भारतात प्रवेश केला, असा अंदाज देशाच्या प्रमुख संशोधन संस्थांच्या अव्वल शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, इंडियन स्ट्रेनचा मोस्ट रिसेंट कॉमन अ‍ॅन्सेस्टर अर्थात एमआरसीए (MRCA) नोव्हेंबर, 2019 पासून पसरत आहे. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, वुहानच्या कोरोना विषाणूच्या पहिला स्ट्रेनचा प्रसार गेल्या वर्षी 11 डिसेंबरपर्यंत राहिला.

एमआरसीए वैज्ञानिक तंत्राचा वापर करून, शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की, सध्या तेलंगणासह अन्य राज्यात पसरत असलेल्या कोरोनाचा जन्म 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान झाला आहे. त्याची सरासरी तारीख 11 डिसेंबर मानली जाते. मात्र, कोरोनाने 30 जानेवारीपूर्वी चिनी प्रवाश्यांद्नीवारे भारतात प्रवेश केला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही, कारण त्यावेळी देशात कोरोना चाचणी होत नव्हती. शास्त्रज्ञांनी भारतातील या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनला क्लेड I/A3i असे नाव दिले आहे. (हेही वाचा: कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर केंद्र आणि राज्य सरकारने 15 दिवसात सर्व प्रवासी मजूरांना घरी पोहचवावे; सुप्रीम कोर्टाचे निर्देशन)

सीसीएमबीचे (CCMB) संचालक डॉ. राकेश मिश्रा म्हणाले की, केरळमध्ये सापडलेल्या भारतातील पहिल्या कोरोनाचा स्ट्रेन हा वुहानशी जोडला गेला होता, परंतु हैदराबादमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना स्ट्रेन हा चीनमध्ये नसून दक्षिणपूर्व आशियातील एका देशातील आहे. हा नेमक्या कोणत्या देशातील आहे हे माहित नाही. सीसीएमबीही देखील या संशोधनात सहभागी होते. कोविड-19 चा हा नवीन स्ट्रेन तमिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. हा नवीन स्ट्रेन बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेशातही काही प्रमाणात पसरला आहे.