मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) 10 वर्षांच्या मुलीसाठी दोन महिलांमधील भांडणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एका दशकापासून अल्पवयीन मुलीचे संगोपन आणि पालनपोषण करणाऱ्या पालक आईला तिच्यापासून वेगळे करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या 10 वर्षांच्या मुलीच्या जैविक आईने ती 100 दिवसांची असताना तिच्या वहिनीच्या स्वाधीन केले होते. आता मुलगी 10 वर्षांची झाली आहे, इतक्या वर्षानंतर जैविक आई आपली मुलगी परत मागत आहे. महिलेच्या वाहिनीने दत्तक घेतलेली मुलगी परत करण्यास नकार दिल्याने हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.
येथे न्यायालयाने स्पष्ट केले की, मुलीला तिच्या पालक आईपासून हिरावून घेता येणार नाही. परंतु, तिची जैविक आई आणि भावंड तिला विकेंडला भेटू शकतात. न्यायमूर्ती पीएन प्रकाश आणि न्यायमूर्ती आर हेमलता यांच्या खंडपीठाने सालेममधील बाल कल्याण समितीचा आदेश रद्द केला, ज्यामध्ये मुलाला स्थानिक देखभाल गृहात ठेवण्यात आले होते. मुलीला तिची दत्तक आई सत्या यांच्याकडे परत सोपवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
शिवकुमार आणि सरन्या यांनी 2012 मध्ये त्यांची दुसरी मुलगी सत्या आणि रमेश या निपुत्रिक दाम्पत्याला दत्तक दिली होती. त्यावेळी मुलगी अवघी 100 दिवसांची होती. जून 2019 मध्ये रमेशचा कर्करोगाने मृत्यू झाला आणि दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला, ज्यामुळे संबंध बिघडले. शेवटी सरन्याने सत्याला तिची मुलगी मागितली. हे प्रकरण स्थानिक पोलीस ठाण्यात गेले आणि मुलीला सालेमच्या बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले. (हेही वाचा: पत्नीने घटस्फोटासाठी मागितले 1 कोटी, व्हिडिओच्या माध्यमातून दु:ख सांगत नवऱ्याने केली आत्महत्या)
दरम्यान, दोन्ही आयांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करून मुलीची कस्टडी मागितली. उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश यांनी सांगितले की, मुलीला व तिच्या दोन्ही आयांना न्यायालासमोर बोलावले तेव्हा दिसून आले की, मुलीचे दोन्ही आयांवर प्रेम आहे. तिला दोघींच्यासोबत राहायचे आहे जेणेकरून ती तिच्या भावंडांसोबत राहू शकेल. यावेळी शिवकुमार आणि सरन्या सत्या हिच्याकडून अल्पवयीन मुलाला हिसकावून घेऊ शकत नाहीत, असे खंडपीठाने स्पष्ट केले.