1 जुलैपासून एटीएमच्या (ATM) नियमांमध्ये बदल होत आहेत. आता पूर्वीच्या नियमाप्रमाणे, तुम्ही जर 1 जुलैपासून दुसर्या बँकेच्या एटीएममधून मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले, तर बँक तुम्हाला फी आकारू शकते. या प्रकरणात एसबीआयने (SBI) एटीएममधून पैसे काढण्याचा नियम जारी केला आहे. याआधी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 24 मार्च रोजी, एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कावरून 30 जून पर्यंत दिलासा दिला होता. अर्थमंत्र्यांनी सांगितले होते की, डेबिट कार्डधारक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून तीन महिन्यांपर्यंत रोख रक्कम काढू शकतात. यासाठी त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
एटीएममधून पैसे काढण्याबाबत प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम आहेत. मात्र, आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमच्या नियमांकडे पहिले तर, मेट्रो शहरांमध्ये एटीएममधून तुम्ही 8 वेळा मोफत पैसे काढू शकता. यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून 5 व्यवहार करता येतात, तर इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून 3 व्यवहार करता येतात. तर छोट्या शहरांमधील एसबीआय ग्राहक विनामूल्य 10 एटीएम व्यवहार करू शकतात. यापैकी पाच व्यवहार एसबीआय आणि अन्य पाच बँकांच्या एटीएमसाठी आहेत. अशा 8 किंवा 10 व्यवहारानंतर ग्राहकाला इतर व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क भरावे लागते. मात्र लॉक डाऊनमुळे हा नियम शिथिल करून हे शुल्क माफ केले गेले होते.
एसबीआयने एका निवेदनात म्हटले होते की, ‘24 मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर एसबीआयने निर्णय घेतला आहे की, एसबीआय एटीएम व इतर बँकांच्या एटीएममधून नि: शुल्क व्यवहारांची संख्या ओलांडली गेली तरी, 30 जून पर्यंत एसबीआयकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.’ (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा; नोव्हेंबरपर्यंत लागू असेल ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’)
परंतु हा नियम लागू करून आता आज तीन महिने होत आहेत, मात्र अद्याप या नियमाबाबत पुढील आदेश जारी करण्यात आला नाही. त्यामुळे आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी सीतारमण यांनी फक्त 3 महिन्यांसाठीच हा दिलासा दिला होता.