पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा; नोव्हेंबरपर्यंत लागू असेल ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’, 80 कोटी गरिबांना पुढील 5 महिने मिळणार मोफत अन्न
Prime Minister Narendra Modi (Photo Credits: ANI)

देशात जेव्हा कोरोना व्हायरसने (Coronavirus) आपले रंग-रूप दाखवायला सुरु केली, तेव्हाच सरकारने लॉक डाऊन (Lockdown) लागू केला. आता देशात अनलॉक 2 (Unlock 2) ची घोषणा झाली आहे. या काळात अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेशी संवाद साधला आहे. त्याचप्रमाणे आजही पंतप्रधानांनी जनतेसमोर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले. 'कोरोना महामारीशी लढताना आता आपण अनलॉक 2 पर्यंत पोहोचलो आहोत. मात्र आता पावसाळा सुरु होईल व अशा काळात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सध्या देशातील मृत्युदर पाहिला तर, तो जगातील इतर देशांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. देशात वेळीच लॉक डाऊन आणि इतर नियम लागू केल्याने देशातील रुग्णांचा मृत्यूदर रोखला गेला. लॉक डाऊन 1 मध्ये आपण सर्व नियमांचे  पालन केले होते, मात्र अनलॉक 1 मध्ये अनेक नागरिक मनमानी करत असल्याचे दिसत आहे. सध्याचा काळ थोडा कठीण आहे व अशावेळी सर्वांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.’

एएनआय ट्वीट -

ते पुढे म्हणाले, ‘सध्या या कठीण काळात आपण सर्वजण प्रयत्न करत, वेळेवर निर्णय घेत संकटाचा सामना करीत आहोत, अशात देशातील एकही नागरिक भुकेलेला राहणार नाही याची काळजी घेण्यात आली. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक मजुरांना आपले काम सोडून घरी परतावे लागले.' या अनुषंगाने पंतप्रधानांनी देशात सुरु असलेल्या गरीब कल्याण योजना व गरीब रोजगार योजनांबद्दल सांगितले. तसेच त्यांनी या काळात वाटप करण्यात आलेल्या धान्याचाही उल्लेख केला. अमेरिकेच्या लोकसंख्यापेक्षा अडीच पट नागरिकांना सरकारने मोफत अन्नधान्य दिले आहे. असे ते म्हणाले.

एएनआय ट्वीट -

पुढे पंतप्रधानांनी याचबाबत एक महत्वाची घोषणा केली. ते म्हणाले, ’भारतात पावसाळ्यामध्ये कृषीक्षेत्रामध्ये अनेक कामे होतात. तसेच या काळात अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. मात्र या दरम्यान अनेक खर्चही वाढतात. म्हणूनच 'प्रधानमंत्री अन्न योजने'चा विस्तार नोव्हेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. म्हणजेच 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य योजना नोव्हेंबर पर्यंत लागू असेल. या काळात प्रत्येक कुटुंबातील, प्रत्येक सदस्याला 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येईल. तसेच प्रत्येक महिन्यात 1 किलो चणादेखील मोफत दिला जाईल. या योजनेसाठी दीड लाख कोटी खर्च येणार आहे.’ (हेही वाचा: अनलॉक-2 साठी मार्गदर्शक सूचना जाहीर; शाळा-महाविद्यालये, मेट्रो सह धार्मिक समारंभ 31 जुलैपर्यंत बंद; जाणून घ्या काय बंद व काय सुरु)

ते पुढे म्हणाले, ‘सध्या देशात ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेवर भर देण्यात येत आहे. यामुळे कामासाठी बाहेर ठिकाणी जाणाऱ्या मजुरांना याचा फायदा होणार आहे.’ त्यानंतर त्यांनी देशातील कर भरणाऱ्या लोकांचे आणि कृषी क्षेत्रातील लोकांचे आभार मानले. शेवटी पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’चा उल्लेख करीत यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले. तसेच सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्कचा वापर करावा असे आवाहन नागरिकांना केले.