Health Minister Dr Harsh Vardhan in RS: कोविड 19 विरूद्ध लस 2021 च्या सुरूवातीपर्यंत उपलब्ध होऊ शकते; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची राज्यसभेत माहिती
डॉ. हर्षवर्धन (Photo Credits: ANI)

भारतामध्ये दिवसाला सुमारे 90-95 हजारांच्या घरात नव्या रूग्णांची भर पडत असताना आता देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 51 लाखांच्या पार गेली आहे. अशावेळी प्रत्येक भारतीयाला कोविड 19 साठी कारणीभूत असलेल्या कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लस (Vaccine ) कधी येणार? हा प्रश्न पडला आहे. मात्र त्यावर आज देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी माहिती दिली आहे. दरम्यान राज्यसभेत बोलताना त्यांनी 'इतर देशांप्रमाणेच भारत देखील कोविड 19 वरील लसीवर काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली एक्सपर्ट टीम काम करत आहे. आम्ही अ‍ॅडव्हान्स प्लॅनिंग केले आहे. आम्हांला विश्वास आहे 2021 च्या सुरूवातीला भारतामध्ये कोरोना व्हायरस विरुद्ध लस उपलब्ध होऊ शकते. ' असा विश्वास व्यक्त केला आहे.

भारतामध्ये भारत बायोटेक, झायडस कॅडिला आणि सीरम इन्स्टिट्युट कडून कोविशिल्ड या लसींची प्रामुख्याने मानवी चाचणी सुरू आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर, झायडस कॅडिला सध्या दुसर्‍या टप्प्यात आहे तर सीरम इंन्सिट्युटच्या कोविशिल्ड लसीला देखील दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणीला मंजुरी दिली आहे. काही दिवसांपूर्वी युके मध्ये एक व्यक्ती आजारी पडल्याने ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्रझेनेकाच्या लसीचं क्लिनिकल टेस्टिंग थांबावण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा त्यांनी काम सुरू केले आहे. देशभर सध्या या लसींच्या क्लिनिकल टेस्टिंग सुरू आहे.

नुकतीच रशिया कडून देखील त्यांनी विकसित केलेल्या स्फुटनिक वी या लसीच्या उत्पादनासाठी भारतीय खाजगी लॅब डॉ. रेड्डीज सोबत करार होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यासाठी भारतीय रेग्युलेटरी यंत्रणांकडून हिरवा सिग्नल मिळण्याची प्रतिक्षा आहे. जर भारताने मंजुरी दिली तर फेज 3 च्या क्लिनिकल ट्रायल्स करून ती लस देखील लवकरात लवकर उपलब्ध केली जाऊ शकते.

भारत सध्या कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येमध्ये जगात क्रमवारी मध्ये दुसर्‍या स्थानी आहे. देशात महाराष्ट्राची देखील स्थिती चिंताजनक आहे. राज्याने 11 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे देशातील नवे कोरोनाबाधित रूग्ण आणि अ‍ॅक्टिव्ह केस कमी करण्यासाठी लवकरात लवकर लस हाती येणं गरजेचं बनलं आहे.