चंदीगडचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी राजीनामा दिला आहे. शनिवारी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सोनकर यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे मनोज सोनकर विजयी झाले होते. त्यानंतर भाजप गटाची आठ मते अवैध घोषित करण्यात आली होती. (हेही वाचा -JP Nadda President Term Extended: भाजपने वाढवला जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ)
पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी मतपत्रिकेवर लिहून स्वतःहून काँग्रेस-आप युतीची आठ मते अवैध ठरवल्यानंतर सोनकर विजयी झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले होते. निवडणुकीनंतर, काँग्रेस-आप युतीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात निकाल रद्द करण्यासाठी आणि चंदीगडच्या महापौरांच्या निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी केली होती.
भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पीठासीन अधिकाऱ्याला पुढील सुनावणीच्या तारखेला, १९ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले. मात्र या सुनावणी आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.