बिहारमधील (Bihar) खगरिया जिल्ह्यात एका 45 वर्षीय महिलेची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. शेतात महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळून आला. हे प्रकरण खगरियाच्या पसराहा गावाशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या सुलेखा देवी यांची अज्ञातांनी निर्घृण हत्या केली होती. पोलिसांनी रविवारी याबाबत माहिती दिली. या घटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला आहे. प्रकरण समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, विरोध करत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता.
सुलेखा देवी त्यांच्या शेतात कामाला गेल्या असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी भयंकरपणे त्यांचे डोळे बाहेर काढले, जीभ कापली, स्तन कापले इतकेच नाही तर, धारदार शस्त्राने त्यांच्या प्रायव्हेट पार्टसवरही हल्ले केले. ही धक्कादायक माहिती पोलिसांनी रविवारी दिली. गुन्हा करून गुन्हेगार पळून गेले. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
याआधी 25 एप्रिल 2014 रोजी सुलेखा देवी यांचे पती आणि दिराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हे आरोपी गेल्या वर्षी जामिनावर सुटले होते. या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, मात्र नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पत्रकार परिषदेत एसडीपीओ मनोज कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळावरून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा; Uttar Pradesh Rain: उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचे थैमान, 34 लोकांचा मृत्यू)
या निर्घृण हत्येनंतर पीडितेच्या कुटुंबीयांसह स्थानिक रहिवाशांनी पसरहा पोलीस ठाण्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखून निषेध केला, त्यामुळे रस्त्यावर अनेक तास जाम झाला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या एसडीपीओने पीडित कुटुंबाला लवकरच दोषींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले, त्यानंतर हा विरोध थांबवण्यात आला.