Bank (Photo Credit: PTI)

बँक कर्मचारी संघटनांनी (Bank Employee Unions) 19 नोव्हेंबर दिवशी जाहीर केलेला देशव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. आज दिल्लीतील मुख्य कामगार आयुक्त (CLC) यांनी बोलावलेल्या बैठकीत युनियन आणि बँकांमधील वादग्रस्त समस्यांवर तोडगा काढण्यात आल्याने हा संप तात्पुरता मागे घेण्यात आला आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन (AIBEA) चे सरचिटणीस सी एच वेंकटचलम यांनी आज मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीमध्ये, 'सार्‍या मुद्द्यांवर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला आहे. आयबीए आणि बँकांनी समस्या सोडवण्यास सहमती दर्शविली असल्याने उद्याचा संप मागे घेण्यात आला आहे. बैठकीत, CLC ने IBA आणि संघटनांना वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करण्याचा सल्ला दिला तर सरकारी प्रतिनिधीने देखील बँक कर्मचारी संघटनांना त्यांचा संप रद्द करण्याची विनंती केली, असे व्यंकटचलम म्हणाले. (हे ही वाचा:- Digital Currency: भारताला मिळणार डिजिटल चलन, रिझर्व्ह बँक आज करणार सादर; नेमका कोणाला होणार फायदा?)

बॅंकेमध्ये कर्मचारी काढून टाकणे, बँकांमधील वाढते आउटसोर्सिंग आणि काही बँकांमध्ये वेतन सुधारणेची अंमलबजावणी करण्यास होणारा विलंब यावरून 19 नोव्हेंबरला बॅंक संघटना संपावर जाण्याच्या तयारीमध्ये होत्या. या संपामध्ये बँक ऑफ बडोदा आणि पंजाब अँड सिंध बँकेसह अनेक बँकांनी सहभाग दर्शवत त्यांच्या ग्राहकांना 19 नोव्हेंबरचा संप झाल्यास शनिवारी बॅंकेच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो याची पूर्वकल्पना दिली होती.

काही बँकांद्वारे नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग खालच्या स्तरावरील भरती कमी करण्याव्यतिरिक्त ग्राहकांची गोपनीयता आणि त्यांचे पैसे धोक्यात आणत असल्याचा आरोप युनियन कडून करण्यात आला आहे.