
अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya's Ram Mandir) बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे मंगळवारी संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली होती. बरेलीहून लखनऊ कंट्रोल रूमला 112 क्रमांकावर कॉल करून ही धमकी देण्यात आली. यानंतर लखनौ पोलीस आणि अयोध्या पोलिसांनी तपास सुरू केला. ज्या मोबाईल नंबरवरून कॉल करण्यात आला तो बरेलीचा असल्याचे तपासात समोर आले.
बरेली पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे बरेलीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. धमकी देणारी व्यक्ती बरेली येथील रहिवासी असून त्याचे वय 14 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. तो 8 वीचा विद्यार्थी आहे. पोलीस आता विद्यार्थ्याची चौकशी करत आहेत.
युट्यूबवरील व्हिडिओ पाहून विद्यार्थ्याने मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. एसपी देहाट बरेली मुकेश चंद्र यांनी सांगितले की, 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 112 क्रमांकावर कॉल करण्यात आला. त्यावर अयोध्येतील राम मंदिर बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी दिली गेली. त्यानंतर तो मोबाईल क्रमांक ट्रेस करण्यात आला. तपास केला असता, मोबाईल नंबर इटौरिया, फतेहगंज पूर्व, बरेली येथील रहिवासी गिरीशच्या नावाने नोंदविलेला असल्याचे आढळले. (हेही वाचा: Sanatan Dharma Row: अयोध्येमधील संतांची उदयनिधी स्टॅलिन यांच्याकडून बिनशर्त माफीची मागणी, नाहीतर तामिळनाडूपर्यंत मोर्चा काढण्याची धमकी)
त्यानंतर एक पथक रात्री गिरीशच्या घरी पोहोचले. त्यावेळी गिरीशने सांगितले की, संध्याकाळी मोबाईल घरातील एका मुलाकडे होता. पोलिसांनी या 14 वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीमध्ये त्याने सांगितले की त्याने यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला होता, ज्यामध्ये 21 सप्टेंबरला राम मंदिरावर बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याने डायल-112 वर कॉल करून याची माहिती दिली. मात्र पोलिसांनी कॉलवर त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता तो घाबरला आणि त्याने कॉल डिस्कनेक्ट केला आणि मोबाईल बंद केला. त्यानंतर गोंधळ वाढला.