Donald Trump| Wikimedia Commons

Automatic US Citizenship By Birth: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) दुसऱ्यांदा व्हाईट हाऊसमध्ये बसण्याच्या तयारीत आहेत. लवकरच ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या प्राधान्यक्रमात मोठा बदल दिसून येऊ शकतो. निवडणुकीपूर्वीच, ट्रम्प-वन्स मोहिमेच्या अधिकृत वेबसाइटने म्हटले होते की, नवीन सरकारच्या पहिल्याच दिवशी एका प्रस्तावावर स्वाक्षरी केली जाईल, ज्यामुळे ज्या मुलांचे पालक अमेरिकन नागरिक नाहीत त्यांना आपोआप नागरिकत्व मिळू शकत नाही. म्हणजेच अमेरिकेत जन्मलेल्या मुलांचे पालक अमेरिकन नागरिक नसल्यास त्यांना नागरिकत्व मिळू शकणार नाही.

बेकायदेशीरपणे अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांच्या मुलांवर या प्रस्तावाचा परिणाम होणार आहे. तसेच या अंतर्गत भविष्यात अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी मुलाचे पालक अमेरिकन नागरिक किंवा कायमचे नागरिक (ग्रीन कार्डधारक) असावेत, अशीही अट असेल. या प्रस्तावावरून बराच वाद झाला होता. अनेक स्थलांतरित वकील हे अमेरिकन राज्यघटनेतील 14 व्या दुरुस्तीचे उल्लंघन मानतात. जर हा आदेश मंजूर झाला तर त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

पूर्वी H-1B व्हिसावर काम करणाऱ्या भारतीयांसाठी ग्रीन कार्डची प्रक्रिया अत्यंत संथ होती आणि आता या प्रस्तावामुळे त्यांची परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीमुळे अनेक दिवसांपासून ग्रीन कार्डसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या भारतीय कुटुंबातील मुलांना नागरिकत्वाची संधी आपोआप संपुष्टात येणार आहे. याबाबत एक इमिग्रेशन वकील अश्विन शर्मा यांनी हा प्रस्ताव अत्यंत क्रूर आणि अव्यवहार्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की H-1B व्हिसा धारण करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी हा मोठा धक्का असेल, कारण त्यांची सर्वात मोठी आशा होती की, त्यांच्या यूएसमध्ये जन्मलेल्या मुलांना किमान यूएस नागरिकत्व मिळेल जे त्यांना इमिग्रेशनच्या समस्यांपासून वाचवेल. (हेही वाचा: US 2024 Election Cost: अमेरिकेची यंदाची अध्यक्षपदाची निवडणूक ठरली इतिहासातील 'सर्वात महागडी'; मोहिमांद्वारे खर्च झाले विक्रमी 15.9 अब्ज डॉलर्स)

हा मुद्दा अमेरिकेच्या राज्यघटनेच्या 14 व्या दुरुस्तीशी संबंधित आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की अमेरिकेत जन्मलेली व्यक्ती अमेरिकेची नागरिक असेल. मात्र,  ट्रम्प प्रशासन या दुरुस्तीचे अधिकार क्षेत्र पुन्हा परिभाषित करण्याचा प्रयत्न करीत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने वोंग किम आर्क प्रकरणात निर्णय दिला होता की, अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना त्यांचे पालक परदेशातील असले तरी त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळेल. दरम्यान, प्यू रिसर्चने केलेल्या यूएस सेन्सस (2022) च्या विश्लेषणानुसार, यूएसमध्ये अंदाजे 4.8 दशलक्ष (48 लाख) भारतीय अमेरिकन राहतात, त्यापैकी 34 टक्के किंवा 1.6 दशलक्ष यूएसमध्ये जन्मलेले आहेत. या कार्यकारी आदेशामुळे अमेरिकेत जन्मलेली भारतीय मुले आपोआप मिळणाऱ्या  नागरिकत्वासाठी पात्र राहणार नाहीत.