Atma Nirbhar Bharat Abhiyan: कोळसा क्षेत्रात 50,000 कोटींची गुंतवणूक; बॉक्साइट व कोळसा खनिज ब्लॉकचा एकत्र लिलाव होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (संग्रहित संपादित प्रतिमा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना विषाणू (Coronavirus) संकटात आर्थिक मंदीच्या परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी, आत्मनिर्भर भारत अभियानाला (Atma Nirbhar Bharat Abhiyan) सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत केंद्र सरकारने 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. गेले तीन दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) याबाबत माहिती देत आहेत. आज या पॅकेजबद्दल माहिती देताना सीतारमण यांनी आजच्या घोषणा या विविध क्षेत्रामधील संरचनात्मक सुधारणेबाबत असल्याचे सांगितले.

सध्या अनेक क्षेत्रे अनेक संकटांचा सामना करीत आहे. अशात 8 अशी क्षेत्रे आहेत, ज्यांच्या विकासाकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. आजच्या पॅकेजद्वारे अशा 8 क्षेत्रांना उभारी देण्याचे काम केले जाईल. यामध्ये कोळसा, खनिजे, संरक्षण उत्पादन, हवाई क्षेत्र व्यवस्थापन, एमआरओ, उर्जा वितरण कंपन्या, अंतराळ क्षेत्रे, अणु ऊर्जा यांचा समावेश आहे.

यामध्ये पहिल्यांदा कोळसा क्षेत्रावर भर देत व्यावसायिक खाणकामावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. कोळसा क्षेत्रामध्ये भारत कसा आत्मनिर्भर होईल आणि जितकी आवश्यकता आहे तितकाच कोळसा कसा बाहेरून आणता येईल, यावर लक्ष दिला जाणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. कोळसा क्षेत्रात खासगी क्षेत्रातील स्पर्धा, पारदर्शकता आणि खाजगी क्षेत्रातील सहभागाची अंमलबजावणी व्हावी यासाठी रेव्हेन्यू शेअरिंग मेकॅनिझमचा वापर केला जाणार आहे. यासाठी 50,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे व यामध्ये 2023-24 पर्यंत कोल इंडिया लिमिटेडचे 1 अब्ज टन कोळशाचे उत्पादन करण्याचे लक्ष्य असणार आहे.

पुढची घोषणा खनिजे क्षेत्राबद्दल होती. खुल्या आणि पारदर्शक लिलाव प्रक्रियेद्वारे 500 खाण ब्लॉक्स देण्यात येणार आहेत. अल्युमिनियम उद्योगाची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी बॉक्साइट व कोळसा खनिज ब्लॉकचा संयुक्त लिलाव सादर केला जाणार आहे. याद्वारे खनिजे क्षेत्राचा विकास होईल तसेच अनेकांना रोजगार उपलब्ध होईल, असे अर्थमंत्री म्हणाल्या.