संपूर्ण देशात सध्या कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट सुरु आहे, अशात काळी बुरशी (Black Fungus), पांढरी बुरशी (White Fungus) आणि पिवळी बुरशी (Yellow Fungus) या आजारांनी डोके वर काढले आहे. यानंतर आता संसर्गाचा एक नवीन प्रकार चिंतेचा विषय ठरला आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये (Vadodara) काळ्या बुरशीच्या 262 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याबरोबर शहरात आता एस्परगिलोसिस (Aspergillosis) नावाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढला आहे. सायनसमध्ये त्याचे संक्रमण होते. या नवीन आजाराने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना रूग्ण किंवा कोरोनामधून बरे झालेल्या लोकांना हे संक्रमण होत आहे.
वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात या नवीन बुरशीजन्य इन्फेक्शनचे 8 रुग्ण आहेत ज्यांना गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आले होते. शहर व जिल्हा प्रशासनाचे कोविड-19 सल्लागार डॉ. शीतल मिस्त्री यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, 'पल्मोनरी एस्परगिलोसिस बहुधा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये आढळतो, परंतु सायनसचा एस्परगिलोसिस फारच क्वचित आढळतो. कोविडमधून बरे झालेले किंवा उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग दिसून आला आहे. एस्परगिलोसिस हा म्युकोरमायकोसिससारखा विकृत नसला तरी तो आक्रमक आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बुरशीजन्य संसर्गाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत, कारण रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्टिरॉइड्सचा वापर केला जात आहे. तसेच, ऑक्सिजन पुरवठा हायड्रेट ठेवण्यासाठी निर्जंतुकीकरण नसलेल्या पाण्याचा उपयोग देखील याचे एक कारण असू शकते. वडोदराच्या याच रुग्णालयात, मल्टी ड्रग्स रेझिस्टन्स यीस्ट इन्फेक्शन कॅन्डिडा ऑरिसची 13 प्रकरणे समोर आली आहेत.
दरम्यान, इटलीमध्ये 1721 मध्ये एस्परगिलोसिस रोगाच्या बुरशीची ओळख झाली होती. याच्या 200 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. अनेक व्यक्ती बुरशीला बळी पडतात, परंतु जे लोक फुफ्फुसांशी संबंधित रोगाने ग्रस्त आहेत किंवा ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहेत त्यांना या संसर्गाचा धोका अधिक आहे.