‘हिंदू हिंसक आहेत’, ‘जुलमी आहेत’, ‘हिंदू नरसंहार करतात’, ‘हिंदू विश्वासघातकी तसेच धर्मद्रोही आहेत’, ‘हिंदू इतर धर्मांचा द्वेष करतात’... सोशल मीडियावर हिंदूंच्या विरोधात अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. नुकतेच अमेरिकेच्या एका अहवालात जगभरात हिंदूंविरोधात कसा द्वेष पसरवला जात आहे, हे समोर आले आहे. सोशल मीडियावर हिंदूंविरोधात द्वेषपूर्ण भाषणांचा पूर आल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
अमेरिकेतील रटगर्स युनिव्हर्सिटी (Rutgers University) आणि एनसीआरआय (नेटवर्क कॉन्टेजिन रिसर्च इन्स्टिट्यूट) च्या संशोधकांनी त्यांच्या ताज्या अभ्यासात म्हटले आहे की, सोशल मीडियावर हिंदुविरोधी प्रचार अभूतपूर्व वेगाने वाढला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हिंदूंच्या विरोधात मोहीम चालवली जात आहे. एनसीआरआय आणि रटगर्स युनिव्हर्सिटीने 'हिंदूविरोधी डिसइन्फॉर्मेशन: अ केस स्टडी ऑफ हिंदूफोबिया ऑन सोशल मीडिया' या नावाने हा संशोधन अभ्यास केला आहे.
संशोधकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जानेवारी 2019 ते जून 2022 पर्यंतच्या डेटाचे विश्लेषण केले. या अभ्यासानुसार, दहशतवादी इस्लामिक वेब नेटवर्क जगभरात हिंदूंच्या विरोधात विष पसरवत आहे. यामध्ये द्वेषयुक्त भाषणापासून ते हिंदूंविरोधातील हिंसाचारापर्यंत मोहीम सुरू आहे. या अभ्यासानुसार जगभरातील लोकांना हिंदूंच्या विरोधात भडकवले जात आहे. त्यांचे वर्णन असभ्य, हिंसक, विधर्मी, अत्याचारी असे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुस्थानातील मुस्लिमांवर हिंदू अत्याचार करतात, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर होत आहेत.
या संशोधनात सविस्तर सांगण्यात आले आहे की, सोशल मीडियावर हिंदूंविरोधात मीम्स, मेसेज, कार्टून, फोटो आदींचा वापर केला जात आहे. यामध्ये इस्लामिक वेब नेटवर्कचा मोठा हात आहे. असे संदेश टेलीग्राम आणि इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर देखील पसरवले जात आहेत. यामुळे कदाचित देशात धार्मिक तणाव वाढू शकतो, ज्याची परिणीती हिंसाचारात होऊ शकते. (हेही वाचा: 'कोणत्याही शब्दावर बंदी नाही', असंसदीय शब्दांच्या वादावर लोकसभा अध्यक्ष Om Birla यांचे स्पष्टीकरण)
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर सोशल मीडियावरील हिंदुविरोधी लाट तीव्र झाली. अमेरिकन संशोधकांच्या मते, इराणी ट्रोलर्सनी हिंदूंच्या विरोधात सुमारे दहा लाख ट्विट केले. ट्रोल करणाऱ्यांनी हिंदूंच्या विरोधात बनवलेल्या मीम्सद्वारे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, हिंदूंकडून अल्पसंख्याकांकडून हत्या करण्यात आली आहे. अमेरिकन संशोधकांचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावरील अशी मोहीम केवळ हिंदूंच्या विरोधातच नाही तर शीख आणि बौद्धांविरोधातही तीव्र झाली आहे.