दक्षिण भारतातील ओडिशा (Odisha) राज्यात वेगवान फनी वादळाने (Cyclone Fani) घातलेला धुमाकूळ जरी थांबला असला तरी झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी अजून बरच कालावधी लागणार असल्याचे दिसून येतेय. एकाएकी घोंगावत आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disaster) राज्यातील कित्येकांचे बळी गेले तर सोबतच अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. या आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करत अनेक मंडळी सोशल मीडियावर पुढे येताना पहिला मिळत आहेत. मात्र आपली आत्मीयता केवळ ऑनलाईन माध्यमांपुरती मर्यादित न ठेवता बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार (Bollywood Star Akshay Kumar) याने प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या नागरिकत्वाच्या वादावरून अक्षय कुमार बराच चर्चेत आहे मात्र यावरून होणाऱ्या टीकांकडे दुर्लक्ष करत त्याने या ओडिशामधील गरजूना 1 कोटी( 1Crore) रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, अक्षयने 1 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री साह्यता निधी (CM Relief Fund) मध्ये जमा केली होती, यांनतर ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात यासंदर्भात माहितीसाठी विचारणा करण्यात आली मात्र तूर्तास त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. फनी वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 1 हजार कोटींची मदत जाहीर
फनी वादळाने शुक्रवारी 3 मे रोजी ओडिशामध्ये धडक दिली होती, प्रतितास साधारण 200किमी वेगाने धावत असणाऱ्या या वादळाने मोठं थैमान घातलं होत. यानंतर झालेल्या नुकसानाला भरून काढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे देखील 381 कोटींची मदत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून ओडिशाला 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. या व्यतिरिक्त ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केंद्राकडे 17,000 कोटींची मदत मागितली होती, तसेच वादळात कोसळलेल्या घरांची पुनर्बांधणी व आपत्तीकाळात संपर्कासाठी मजबूत दूरसंचार यंत्रणा उभारण्याच्या हेतूने देखील निधी मागण्यात आला आहे.
अशा प्रकारे आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची ही काही अक्षय कुमारची पहिलीच वेळ नाही यापूर्वी देखील अक्षयने पुलवामाच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जीत राम गुर्जर यांची पत्नी सुदंरी देवीला 15 लाख रुपयांची मदत केली होती, शिवाय भारत के वीर या ऍपच्या उभारणीत देखील त्याचा हातभार होता.