गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील प्रदूषणाची (Air Pollution in Delhi) पातळी अत्यंत खराब होत चालली आहे. यामुळे राजधानीमधील लोकांच्या अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. आता एका अहवालात असे स्पष्ट झाले आहे की, दिल्लीत मागील वर्षी PM 2.5 ने झालेल्या वायू प्रदूषणामुळे जवळपास 54 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकांपेक्षा सहापट जास्त होती. त्याचबरोबर डब्ल्यूएचओने दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल इशारा दिला आहे की प्रदूषणामुळे लोकांच्या समस्येमध्ये वाढ होऊ शकते आणि यामुळे लाखो लोकांचा बळी जाऊ शकतो.
ग्रीनपीस आग्नेय आशियाद्वारे (Greenpeace Southeast Asia) वायू गुणवत्तेच्या विश्लेषणाचा अंदाज आहे की, PM 2.5 च्या प्रदूषणामुळे दिल्लीत प्रति दहा लाख लोकसंख्येमध्ये 18 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अभ्यासात म्हटले आहे की, पीएम 2.5 च्या प्रदूषणामुळे 2020 मध्ये भारताच्या राष्ट्रीय राजधानीत सुमारे 54,000 लोक मरण पावले आहेत. पीएम 2.5 हा हवेतील सूक्ष्म कण असून ज्याचा आकार 2.5 मायक्रोमीटर आहे. अभ्यासानुसार, जागतिक पातळीवर पर्यावरणास धोका पोहचवण्यामध्ये पीएम 2.5 चा संपर्क धोकादायक मानले जाते.
यामुळे 2015 मध्ये सुमारे 42 लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला होता. अभ्यासानुसार, असेच नुकसान इतर भारतीय शहरांमध्येही होत आहे व ही बाब चिंताजनक आहे. ग्रीनपीस अभ्यासानुसार असा दावा केला जात आहे की, मुंबईत 2020 मध्ये पीएम 2.5 मुळे 25,000 लोक मरण पावले होते, जे टाळले जाऊ शकले असते. त्याचप्रमाणे, बंगलोर, चेन्नई, हैदराबाद आणि लखनौमध्ये अनुक्रमे 12 हजार, 11 हजार, 11 हजार आणि 6700 लोकांचे मृत्यू टाळले जाऊ शकले असते. अभ्यासानुसार, प्रदूषणामुळे दिल्लीचे अंदाजे 8.1 अब्ज डॉलरचे नुकसान झाले जे त्यांच्या जीडीपीच्या 13 टक्के आहे.