58,000 कोटींच्या कर्जाखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांची मार्च महिन्यात विक्री: अर्थमंत्री निर्मला सीतारमण
Union Finance Minister Nirmala Sitharaman | (Photo Credit: Twitter/FinMinIndia)

देशातील दोन मोठ्या सरकारी कंपन्या एअर इंडिया (Air India) आणि भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) या मागील काही काळापासून कर्जबाजारी झाल्या आहेत, तब्बल 58,000 कोटींचे कर्ज असणाऱ्या या कंपन्यांची आर्थिक बाजू सावरण्यासाठी आता सरकारने या कंपन्या खाजगी व्यापाऱयांना विकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार येत्या वर्षातील मार्च महिन्यात ही विक्री केली जाईल. या संदर्भात सध्या कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाशी चर्चा सुरु असून या वर्ष अखेरीपर्यंत या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतो.

(गृहनिर्माण क्षेत्राला केंद्र सरकारचा दिलासा, 25 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा)

प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पत्र लिहीत कंपनीच्या सक्षमतेसाठी खाजगी गुंतवणूक फायद्याची ठरू शकेल असा विश्वास व्यक्त केला होता तर सिथरामन यांच्या माहितीनुसार, एअर इंडिया मध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या व्यापाऱ्यांनी देखील पुढाकार दर्शवला आहे.

यापूर्वी 2018 मध्ये सरकार तर्फे एअर इंडियाच्या विक्री संदर्भात चर्चा सुरु करण्यात आली होती, मात्र त्यावेळेस खरेदीदाराला 76 टक्के मालकी देण्याचे ठरले होते, मात्र या व्यवहारासाठी एकही निविदा दाखल झाली नाही. उर्वरित 21 टक्के  मालकीमुळे व्यवसायात अडथळा येऊ शकेल या भीतीने खरेदीदार पुढे आले नव्हते मात्र यावेळेस हा अडथळा दुर करून संपूर्ण 100% मालकी हक्कासाठी विक्री होणार असल्याचे समजत आहे. तूर्तास हे पूर्ण हक्क सरकार कडे आहेत.

दरम्यान, मागील आर्थिक वर्षात तेलाच्या वाढत्या किमंतीसहित अनेक कारणांमुळे एअर इंडियाला 4,600 कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. दुसरीकडे, भारत पेट्रोलियमच्या बाबतीत सरकार व व्यवस्थापक मंडळाने 53.29 टक्के मालकीचे शेअर विकण्यात काढण्याचे ठरवले आहे. सद्यघडीला भारत पेट्रोलियमची बाजार किंमत ही 1.02 लक्ष कोटी इतकी आहे त्यामुळेच संबधित शेअर्सच्या विक्रीसाठी सरकारला किमान 65,000 कोटी रुपयांच्या निविदा अपेक्षित आहेत