Bihar: काय सांगता? बिहारमधील विद्यार्थ्याला परीक्षेत मिळाले 100 पैकी 151 गुण; विद्यापीठाने दिले 'हे' स्पष्टीकरण
प्रतिकात्मत फोटो (File Photo)

बिहारमध्ये (Bihar) अनेकदा शिक्षणाशी संबंधित विचित्र प्रकरणे समोर येतात. आता असेच एक प्रकरण समोर आले आहे जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळाले, तर त्याला नक्कीच आनंद होईल. परंतु कल्पना करा जर त्याला 100 पैकी 151 गुण मिळाले तर? तो कदाचित डोके धरून बसेल. दरभागा येथील राज्य सरकारच्या ललित नारायण मिथिला विद्यापीठातील बीएच्या विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडला आहे.

या विद्यार्थ्याला एका परीक्षेत 100 पैकी 151 गुण मिळाले, जे पाहून आनंदी व्हायचे की तक्रार घेऊन विद्यापीठात जायचे हेच समजत नव्हते. विद्यार्थ्याने सांगितले की तो निकाल पाहून खरोखरच आश्चर्यचकित झाला. ही Provisional मार्कशीट असली तरी अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करण्यापूर्वी ती तपासून घ्यायला हवी होती, असे त्याचे म्हणणे आहे. याच विद्यापीठातील आणखी एका विद्यार्थ्याला बी.कॉम भाग-2 च्या परीक्षेत लेखा आणि वित्त पेपर-4 मध्ये शून्य गुण मिळाले आहेत.

मात्र, असे असतानाही त्याला पुढील वर्गात बढती देण्यात आली आहे.  ही टायपिंगची चूक असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका देण्यात आली आहे. ललित नारायण मिथिला विद्यापीठाचे कुलसचिव मुश्ताक अहमद यांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये टायपिंगच्या चुका होत्या. त्रुटी दूर करून दोन विद्यार्थ्यांना नवीन गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मिळणार 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज; जाणून पात्रता व कुठे कराल अर्ज)

दरम्यान, बिहारमधील भावी पिढी नेमकी कोणत्या दिशेला जात आहे याचे एक स्पष्ट उदाहरण राज्यातील समस्तीपूर येथील रोसाडा येथे पाहायला मिळाले. या ठिकाणी इयत्ता आठवीचा विद्यार्थी शाळेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कट्टा (देसी बंदूक) घेऊन आला होता. पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी शाळेत पोहचून शस्त्र ताब्यात घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यानंतर मुख्याध्यापक प्रदीप पासवान यांनी संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला.