![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/02/Shocking-realities-of-unemployment-and-Jobs-in-Maharashtra-380x214.jpg)
देशातील जॉब मार्केटबाबत (Job Market) एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणू महामारी सुरू झाल्यापासून एप्रिल 2022 मध्ये नोकरीच्या बाजारपेठेत सर्वात वेगवान विस्तार झाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 मध्ये देशात 88 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. साथीच्या आजारानंतर एका महिन्यात मिळणाऱ्या या सर्वाधिक नोकऱ्या आहेत. परंतु मागणीच्या तुलनेत उपलब्ध नोकऱ्या या पुरेशा नाहीत.
CMIE चे MD आणि CEO महेश व्यास म्हणाले की, एप्रिलमध्ये भारतातील कामगार संख्या 88 लाखांनी वाढून 43.72 कोटी झाली आहे. महामारी सुरू झाल्यापासूनचा हा सर्वोच्च आकडा आहे. मार्चअखेर देशाची कामगार बाजारपेठ 42.84 कोटी होती. आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये देशातील श्रमशक्तीमध्ये सरासरी मासिक वाढ दोन लाख होती. या अहवालात असे म्हटले आहे की एका महिन्यात नव्याने काम मिळवणाऱ्या लोकांची सरासरी वाढ वीस लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही. याचा अर्थ एप्रिलमध्ये ज्यांच्याकडे याआधी कोणतेही काम नव्हते अशांनाही नोकऱ्या मिळाल्या आहेत.
गेल्या तीन महिन्यांत 1.20 कोटींच्या घसरणीनंतर एप्रिलमध्ये 88 लाख नोकऱ्यांची वाढ झाली आहे. व्यास म्हणाले की, श्रमिक बाजारपेठ गतिमान राहणे हे ठराविक वेळी रोजगाराची मागणी वाढण्यावर अवलंबून असते. एप्रिलमध्ये रोजगारात झालेली वाढ ही प्रामुख्याने उद्योग आणि सेवा क्षेत्रात होती. उद्योग क्षेत्रात 55 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, तर सेवा क्षेत्रात 67 लाख नोकऱ्यांची भर पडली. या काळात कृषी क्षेत्रातील रोजगार 52 लाखांनी कमी झाला. (हेही वाचा: Bharti Airtel पुण्यात सुरु करत आहे Technology Centre; 500 जणांची होत आहे नोकरभरती, जाणून घ्या सविस्तर)
अहवालानुसार, कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी कमी होण्याचे कारण रब्बी कापणीचा हंगाम संपणे असू शकते. गव्हाच्या उत्पादनात झालेली घटही याला कारणीभूत ठरली आहे. नवीन उद्योगातील नोकऱ्या या चांगल्या दर्जाच्या असण्याची शक्यता नाही, कारण अहवालात म्हटले आहे की, नोकऱ्यांमधील वाढ प्रामुख्याने रोजंदारीवर काम करणारे आणि लहान व्यापारी यांच्यात झाली आहे.