कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीमुळे सरकारने लॉक डाऊन (Lockdown) जाहीर केले होते. या लॉक डाऊनमध्ये अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. या कालावधीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने लोकांना नोकऱ्या देण्यासाठी हात पुढे केला. आता मागील महिन्यात मोदी सरकारने सुरू केलेल्या एका सरकारी पोर्टलवर 7 लाखाहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. मात्र 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान या पोर्टलवरून केवळ 691 लोकांनाच नोकर्या मिळाल्या आहेत. केंद्राने 11 जुलैपासून सुरू केलेल्या एएसईईएम पोर्टलवर (Aatmanirbhar Skilled Employee Employer Mapping) गेल्या 40 दिवसात 69 लाखाहून अधिक व्यक्तींची नोंद झाली आहे.
इंडियन एक्स्प्रेसने एका अहवालात म्हटले आहे की, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पोर्टलवर नोंदणीकृत 3.7 लाख उमेदवारांपैकी केवळ दोन टक्के लोकांनाच रोजगार मिळाला आहे. या व्यतिरिक्त सुमारे 69 लाख स्थलांतरित कामगारांनी पोर्टलवर नोंदणी केली होती, परंतु केवळ 1.49 लाख लोकांनाच नोकऱ्या ऑफर झाल्या होत्या व केवळ 7,700 लोकच कामावर रुजू होऊ शकले.
मंत्रालयाने म्हटले आहे की, हे पोर्टल केवळ प्रवासी कामगारांसाठी नाही. या यादीमध्ये स्वयंरोजगार टेलर, इलेक्ट्रीशियन, फील्ड-टेक्निशियन, सिलाई मशीन ऑपरेटर, कुरियर डिलिव्हरी कामगार, परिचारिका, अकाउंट्स कामगार, मॅन्युअल क्लीनर आणि विक्री सहकारी यांसारखे लोकही सहभागी होऊ शकतात. आकडेवारीनुसार कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, तेलंगणा आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये कामगारांची कमतरता आहे, कारण लॉकडाऊन दरम्यान मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार येथून स्थलांतरित झाले. (हेही वाचा: ‘महाजॉब्स’ संकेतस्थळावर केवळ 4 तासात 13 हजार नोकरी इच्छुकांची तर 147 उद्योजकांची नोकरभरतीसाठी नोंदणी)
असीम पोर्टलवरील आकडेवारीनुसार पंतप्रधानांनी जूनमध्ये 116 जिल्ह्यांमध्ये सुरू केलेल्या गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत, नोकरी शोधत असलेल्या लोकांपैकी केवळ 5.4 टक्के महिला आहेत. पोर्टलवर तब्बल 514 कंपन्या नोंदणीकृत आहेत, त्यापैकी 443 जणांनी 2.92 लाख नोकऱ्या पोस्ट केल्या. यापैकी 1.49 लाख लोकांना नोकरी ऑफर करण्यात आल्याचे आकडेवारी सांगते. परप्रांतीय कामगारांमध्ये काम करण्याची मागणी केवळ एका आठवड्यात 80 टक्क्यांनी वाढली आहे (14 ते 21 ऑगस्ट दरम्यान त्यांची संख्या 2.97 लाखावरून 3.78 लाखांवर गेली आहे) तथापि, यांना काम मिळण्यामध्ये 9.87 टक्के वाढ झाली आहे.