संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. अनेक देशांमध्ये या विषाणूची दुसरी लाट येऊन गेली आहे. भारत अजूनही दुसऱ्या लाटेशी सामना करीत आहे. आता जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी दोन हात करण्याची तयारी करत असताना या विषाणूची चौथी लाटही (4th Wave of Covid-19) येण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेची भीती अनेक देशांना असताना, भारतातील जर्मन राजदूत वॉल्टर जे. लिंडनर (Walter J Lindner) यांनी शनिवारी इशारा दिला की अनेक देशांमध्ये कोरोनाची चौथी लाटही येऊ शकेल.
सध्या कोरोनाचा संभाव्यत: संक्रमित आणि लसी-प्रतिरोधक प्रकार, 'डेल्टा' प्रकार वाढत असल्याने चौथ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो असे लिंडनर यांनी सांगितले. एका ट्वीटमध्ये लिंडनर म्हणाले, 'युरोपच्या काही भागात कोविड केसेसची संख्या कमी होत आहे, त्यामुळे काही निर्बंधांमध्ये शिथिलता आणली गेली आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाचे संभाव्यत: अधिक संक्रमित करणारे आणि लसीकरण-प्रतिरोधक रूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.’ (हेही वाचा: देशाला कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका? पहा काय म्हणाले AIIMS Chief Randeep Guleria)
प्रवासी निर्बंध कमी करण्याविषयी बोलताना ते म्हणाले, विषाणूचे म्युटेशन असलेल्या देशांमधील प्रवासावरील निर्बंध हटविणे ही सोपी बाब नाही. त्यामुळे व्हायरॉलॉजिस्ट आणि आरोग्य तज्ञांचे कार्य येणाऱ्या लाटेपासून नागरिकांचे रक्षण करणे हे आहे. यापूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेने 'डेल्टा' प्रकाराला चिंतेच्या प्रकारांच्या यादीत समाविष्ट केले आहे. या प्रकारामुळे काही देशांमध्ये, विशेषत: भारतात, जिथे हा प्रकार पहिल्यांदा आढळला, तेथे संक्रमणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतामध्ये या प्रकारामध्ये बदल होऊन त्याचा 'डेल्टा प्लस' किंवा AY.1 प्रकारही आढळला आहे.
दरम्यान, चेन्नईजवळील अरिग्नार अण्णा झ्यूलॉजीकल पार्क येथे कोविड-19 संक्रमित सिहांमध्ये 'जीनोम सिक्वेंसींग' समोर आला आहे. हे सिंह डेल्टा प्रकाराने संक्रमित आहेत. कोरोनाचा डेल्टा प्रकार ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरत आहे. यूकेमध्ये, सात दिवसांत डेल्टा प्रकाराने संक्रमित रूग्णांची संख्या 33,630 पर्यंत वाढली आहे.