उत्तर प्रदेशमधील शामली (Shamli) येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. जेव्हा संपूर्ण देश नवीन वर्ष साजरा करण्याच्या तयारीत व्यस्त होता, तेव्हा आंतरराष्ट्रीय भजन गायक (Bhajan Singer) आणि त्यांच्या कुटुंबाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. यावेळी, त्यांचा दहा वर्षांचा मुलगा रहस्यमयरित्या बेपत्ता होता, परंतु आता त्याचा मृतदेहही सापडला आहे.
याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. भजन गायक अजय पाठक (Ajay Pathak) यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली आहे. 31 डिसेंबर रोजी ही घटना घडली. बुधवारी हरियाणाच्या पानिपत येथून अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिस अधीक्षक विनीत जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आदर्श मंडी येथे एका पॉश पंजाबी कॉलनीत अजय पाठक (वय 42), पत्नी स्नेहलता (वय 38), मुलगी वसुंधरा (वय 15) आणि मुलगा भागवत (10) हे राहत होते. ते आपल्या घराच्या वरच्या भागात आणि खालच्या भागात त्यांचे मोठे काका दर्शन पाठक राहत होते. मंगळवारी दुपारपर्यंत अजय पाठक यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य दिसला नाही. जवळच राहणारा त्यांचा भाऊ त्यांना मोबाईलवर संपर्क साधत होता. मात्र काहीच संपर्क होऊ शकला नसल्याने नातेवाईक व शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तीन मृतदेह आढळले. (हेही वाचा: धक्कादायक! 30 हजार रुपयांसाठी मुलाकडून आईची हत्या)
मारेकरी सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर देखील घरी घेऊन गेला. त्यानंतर पाठक यांचा 10 वर्षाचा मुलगा आणि कार बेपत्ता असल्याचे आढळले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी ताबडतोब तपास सुरु केली आणि रात्री पाठक यांच्या जवळ राहणाऱ्या हिमांशू याला पानिपत येथून अटक केली. अटक केलेल्या आरोपीने, त्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने कुटुंबातील तिन्ही सदस्यांची हत्या केली आणि मुलाचे अपहरण केले व गाडीने पानिपत येथे गेल्याचे सांगितले. नंतर त्याने मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह गाडीत ठेवला व गाडीला आग लावली. पोलिसांनी कारमधून जळलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला.