भारतीय तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला देणारे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Infosys Founder Narayana Murthy) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सरकारने पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्राधान्याने हाताळले पाहिजेत आणि त्यासाठी उद्योगातील लोकांनी 3 शिफ्टमध्ये काम करावे, असे नारायण मूर्ती यांनी सांगितले आहे. मूर्ती म्हणाले, ‘भारतीय अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन डॉलर्सची आहे, तर चीन 19 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. एकेकाळी तिथेही आपल्यासारख्या समस्या होत्या, पण चीनने त्यावर उपाय शोधून तो देश आपल्या पुढे सरसावला. आपण अजूनही चीनशी बरोबरी करू शकतो आणि त्याच्या पुढेही जाऊ शकतो, परंतु यासाठी आपल्याला त्वरित निर्णय घ्यावे लागतील.’
बेंगळुरू येथील टेक समिट 2023 च्या 26 व्या आवृत्तीत झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी, 'पुढील 5-10 वर्षांत बंगळुरूला एक चांगले शहर बनण्यासाठी काय केले पाहिजे?', असा प्रश्न विचारला असता नारायण मूर्ती यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक शहर तयार करण्यासाठी, विशेषतः मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, जिथे बहुतेक कंपन्या आहेत तिथे प्राधान्याने कामे करावीत. पायाभूत सुविधा किंवा या उद्योगाशी निगडित लोकांनी 3 शिफ्टमध्ये काम करावे. असे लोक शिफ्टसाठी 11 11 वाजता येतात आणि 5 वाजता शिफ्ट संपवून निघून जातात, असे होऊ नये.’ ते म्हणाले की, परदेशातील लोक दोन शिफ्टमध्ये काम करतात, त्यामुळेच ते आपल्यापेक्षा पुढे आहेत.
समिटमध्ये मूर्ती यांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत सेवांबद्दल सांगितले की, मी मोफत सेवांच्या विरोधात नाही, परंतु जे लोक मोफत सेवा आणि अनुदान घेत आहेत, त्यांनी त्या बदल्यात समाजाच्या कल्याणासाठी योगदान दिले पाहिजे. मोफत योजना सशर्त असाव्यात, असे ते म्हणाले. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील उपस्थिती 20 % वाढली तरच या सेवा उपलब्ध होतील, असे सरकारने लोकांना सांगावे. (हेही वाचा: India Must Spend to Train Teachers: 'आपल्या शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारताने वर्षाला $1 अब्ज खर्च करणे आवश्यक आहे'; Narayana Murthy यांचा सल्ला)
दरम्यान, याआधी नारायण मूर्ती म्हणाले होते की, भारताला पुढे जायचे असेल तर तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावे लागेल. यानंतर सोशल मीडियावर याबाबत मोठी चर्चा झाली होती. मूर्ती यांना या विधानाबाबत जितका पाठिंबा मिळाला तितकीच त्यांच्यावर टीकाही झाली. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी सांगितले की, त्यांचे पती नारायण मूर्ती आठवड्यातून 80 ते 90 तास काम करतात.