Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे वेळोवेळी परदेश दौरे होत असतात. अशा दौऱ्यांच्या वेळी पंतप्रधानांना अनेक भेटवस्तू दिल्या जातात. यासोबतच देशातही अनेक प्रसंगी पीएम मोदी यांना अनेक गिफ्ट्स दिले जातात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू तुम्ही तुमच्या घराचे सौंदर्य बनवू शकता. 17 सप्टेंबर रोजी पीएम मोदींचा वाढदिवस येत आहे, त्यानिमित्त या भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव होणार आहे.

यावेळी सर्वात महागड्या भेटवस्तू या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये जिंकलेले खेळाडू आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंच्या आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रोटोटाइप पुतळा, जो पाहून पंतप्रधानांनी इंडिया गेटचा पुतळा उभारण्यास हिरवा कंदील दिला होता, तोही लिलावात ठेवण्यात आला आहे.

पीएम मोदींना मिळालेल्या भेटवस्तू ई-लिलावासाठी प्रदर्शित करण्याची ही चौथी वेळ आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळालेला पैसा नमामि गंगे कार्यक्रमासाठी वापरला जाणार आहे. पीएम मोदींच्या या भेटवस्तू 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन लिलावात उपलब्ध असतील. कोणतीही व्यक्ती वेबसाइटवर जाऊन लिलावात सहभागी होऊ शकते. भेटवस्तू मूळ किमतीसह वेबसाइटवर उपलब्ध असतील. (हेही वाचा: Nitin Gadkari: मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो, सरकारच्या भरवश्यावर राहू नका; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अनोखा सल्ला)

या लिलावात 1200 हून अधिक वस्तू विकत घेण्यासाठी उपलब्ध असतील. या वस्तूंची किंमत 100 रुपयांपासून 5 ते 10 लाखांपर्यंत उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार लिलाव किंमत टाकून तुम्ही ते मिळवू शकता. तुम्ही 17 सप्टेंबरपासून NGMA च्या वेबसाइटवर लिलावात सहभागी होऊ शकता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींना दिलेल्या भेटवस्तू आणि स्मारकेही लिलावासाठी उपलब्ध असतील.