गेल्या काही महिन्यांपासून भारतात आर्थिक मंदी (Economic Downturn) चालू आहे असे वाक्य नेहमी कानावर पडते. मात्र सध्या याच परिस्थितीबाबत समोर आलेली आकडेवारी पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. तर देशातील श्रीमंतांपैकी 1% लोकांची संपत्ती ही खालच्या वर्गातील 95.3 दशलक्ष, म्हणजेच 70% लोकसंख्येच्या संपत्तीपेक्षा चार पट अधिक आहे. देशाच्या 63 अब्जाधीशांची संपत्ती ही देशाच्या एक वर्षाच्या बजेटपेक्षा अधिक आहे.
2018-19 मध्ये देशाचे बजेट 24 लाख 42 हजार 200 कोटी होते. जगातील 1% श्रीमंत लोकांकडे 6.9 अब्ज लोकांच्या एकूण संपत्तीच्या दुप्पट संपत्ती आहे. जगातील दारिद्र्य संपविण्यासाठी काम करणार्या ऑक्सफेम (Oxfam) या संस्थेने सोमवारी जाहीर केलेल्या 'टाइम टू केअर' अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.
टेक कंपनीच्या टॉप सीईओच्या एका वर्षाच्या पगाराइतकी रक्कम मिळवण्यासाठी, घरात काम करणार्या महिलेला 22,277 वर्षे लागतील असे या अहवालात म्हटले आहे. घरगुती कामगार वर्षातून जितके कमावतात, तितके एक टेक कंपनीचे सीईओ 10 मिनिटांत कमावतो. हे सीईओ प्रति सेकंद 106 रुपये इतके उत्पन्न मिळवतात. या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, जगभरात आर्थिक असमानता फार वेगाने पसरत आहे. श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब अजूनच गरीब होत आहेत. गेल्या दशकात अब्जाधीशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. (हेही वाचा: मुकेश अंबानी सलग 12 वेळा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाहा टॉप 10 श्रीमंतांची यादी)
ऑक्सफेमच्या अहवालानुसार जगातील 2,153 अब्जाधीशांची संपत्ती एकूण 4.6 अब्ज लोकांच्या संपत्तीपेक्षा, किंवा जगातील 60% लोकांपेक्षा अधिक आहे. जगातील 22 श्रीमंत लोकांकडे आफ्रिकेतील सर्व स्त्रियांपेक्षा अधिक संपत्ती आहे. जगातील सर्व पुरुषांची एकूण संपत्ती सर्व महिलांच्या एकूण संपत्तीपेक्षा 50% जास्त आहे. अहवालात असे म्हटले आहे की बर्याच ठिकाणी जागतिक असमानतेची स्थिती धक्कादायक आहे.