भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना सलग 12 व्यांदा फोर्ब्स (Forbes) च्या यादीत स्थान मिळाले आहे. फोर्ब्स तर्फे 2019 वर्षातील सर्वात श्रीमंत 100 भारतीयांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली, ज्यानुसार 51.4 बिलियन डॉलरच्या संपत्तीचे धनी मुकेश अंबानी यांना पहिले स्थान प्राप्त झाले आहे. आश्चर्य म्हणजे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गौतम अडानी (Gautam Adani) यांच्या आणि अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल 35 बिलियन डॉलर इतका फरक आहे. अंबानी यांच्या संपत्तीत इतकी वाढ होण्याचे श्रेय रिलायन्सची दूरसंचार कंपनी जिओ (JIO) ला देण्यात येत आहे. मागील वर्षात जिओच्या 4.1 बिलियन डॉलर इतक्या नफ्यामुळे अंबानी यांना बराच फायदा झाल्याचे समजत आहे.
वास्तविक, 2019 च्या सुरुवातीपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक समस्या होत्या, यामध्ये जागतिक मादीचा फटका बसल्याने भर पडली होती. याचा प्रभाव या यादीत प्रकर्षाने जाणवून येत आहे. टाइकून या कंपनीच्या संपत्तीत 8 टक्क्याची म्हणजेच 452 बिलियन डॉलरची घट होणे हे या मादीचे मोठे उदाहरण आहे. तर दुसरीकडे, गौतम अडानी यांच्या Adani ग्रुप ने यंदा मोठी झेप घेत दुसरे स्थान मिळवले आहे. तसेच आशियातील सर्वात श्रीमंत बँकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदय कोटक यांनी पहिल्यांदाच या यादीत टॉप 5 मध्ये आपली जागा तयार केली आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्ती
मुकेश अंबानी : 51.4 बिलियन डॉलर
गौतम अडानी : 15 .7 बिलियन डॉलर
हिंदुजा ब्रदर्स : 15.6 बिलियन डॉलर
पी मिस्त्री : 15 बिलियन डॉलर
उदय कोटक : 14.8 बिलियन डॉलर
शिव नाडर : 14.4 बिलियन डॉलर
राधाकृष्णन दमानी: 14.3 बिलियन डॉलर
गोदरेज फॅमिली : 12 बिलियन डॉलर
लक्ष्मी मित्तल: 10.5 बिलियन डॉलर
कुमार बिरला: 9.6 बिलियन डॉलर
दरम्यान, या यादीत यंदा नव्या सहा जणांना प्रवेश मिळाला आहे. यामध्ये 3.18 बिलियन डॉलरसहित सिंह परिवार 41व्या स्थानी आहे तर 1.91 बिलियन डॉलरचे धनी Byjus चे मालक बायजू रवींद्रन यांना 71 वे स्थान मिळाले आहे. याशिवाय हल्दीराम स्नॅक्सचे मालक मनोहर लाल आणि मधुसूदन अग्रवाल हे 1.7 बिलियन डॉलर सहित 86 व्या स्थानी आहेत. फोर्ब्स अनुसार भारतातील टॉप 100 श्रीमंत व्यक्तींची नावे जाणून घेण्यासाठी आपण www.forbes.com/india किंवा www.forbesindia.com या संकेतस्थळांना भेट देऊ शकता.