Manish Sisodia Bail Application: मनीष सिसोदिया यांनी राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केली जामीन याचिका
सिसोदिया यांच्या वकिलाने राऊस अॅव्हेन्यू कोर्टात जामीन अर्ज दाखल केला. याआधी सिसोदिया यांनी सीबीआयने केलेल्या अटकेला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Manish Sisodia Bail Application: कथित अबकारी घोटाळ्यात सीबीआय (CBI) ने अटक केलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी शुक्रवारी न्यायालयात नियमित जामीन याचिका दाखल केली. सिसोदिया यांच्या वकिलाने राऊस अॅव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) जामीन अर्ज दाखल केला. याआधी सिसोदिया यांनी सीबीआयने केलेल्या अटकेला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण तिथे सरन्यायाधीशांनी त्यांना आधी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते. यावेळी न्यायालयाने सिसोदिया यांना फटकारताना म्हटलं होतं की, प्रकरण दिल्लीत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जालं.
सिसोदिया पाच दिवसांच्या सीबीआय कोठडीत -
मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारीला आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर सीबीआयने अटक केली होती. यानंतर त्यांना 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले आणि तेथून सिसोदिया यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. (हेही वाचा -Sanjay Raut On Manish Sisodia: केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे, आम्ही सिसोदिया यांच्या पाठीशी उभे राहू; संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र)
सर्वोच्च न्यायालयाकडून दणका दिल्यानंतर सीबीआयने पकडलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी तुरुंगात बंद असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांनीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांचे राजीनामेही स्वीकारले.
सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, वित्त, नियोजन, जमीन आणि इमारती, सेवा, पर्यटन, कला-संस्कृती आणि भाषा, जनजागृती, कामगार आणि रोजगार, आरोग्य, उद्योग, वीज, गृह, नगरविकास, पाटबंधारे आणि पूर नियंत्रण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, जल विभाग होते. सिसोदिया हे दिल्ली सरकारमधील सर्वात प्रभावशाली मंत्री होते. राज्य सरकारची सर्व प्रमुख मंत्रालये त्यांच्यासोबत होती. सिसोदिया हे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सर्वात विश्वासू नेते आहेत.
दरम्यान, सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर त्यांचे सहा विभागही सिसोदिया यांनी हाताळत होते. सत्येंद्र जैन दिल्ली सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. अटकेनंतर सुमारे नऊ महिन्यांनी जैन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2023 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

