मंत्र्याच्या असंवेदनशीलतेच कळस; शहीद जवानाच्या पार्थिवासोबत काढला सेल्फी
के. जे. अल्फोन्स यांचा सेल्फी (संग्रहित-संपादित प्रतिमा)

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. 40 पेक्षा जास्त जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत, यामुळे देशात शोकाकुल वातावरण आहे. पाकिस्तान विरोधात संतापाची लाट आहे, लोक विविध मार्गांनी आपल निषेध व्यक्त करत आहेत. या सर्वांमध्ये एक असंवेदनशील, मूर्खपणाचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. पर्यटन राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) के. जे. अल्फोन्स (Alphons Kannanthanam) या केंद्रीय मंत्र्यांने शहीदाच्या पार्थिवासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी या मंत्र्याला चांगलेच फैलावर घेतले आहे.

के. जे. अल्फोन्स हे भाजपाचे केंद्रीय मंत्री आहेत. पुलवामा येथील शहीद झालेले व्ही. व्ही. वसंतकुमार यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी व्ययनाड येथे पाठवण्यात आले. यावेळी अल्फोन्स यांनी वसंतकुमार यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावली होती. अशा संवेदनशील वेळी अल्फोन्स यांनी वसंतकुमार यांचा पार्थिव देह ठेवलेल्या शवपेटीकडे पाठमोरे उभे राहून सेल्फी काढला. हा फोटो त्यांनी ट्विटर हँडलवर शेअर करून त्याच्याखाली गुडबाय शहीद वसंतकुमार. आम्ही तुमच्यामुळे जिवंत आहोत, अशी कॅप्शनही टाकली. (हेही वाचा : चांगला सेल्फी येत नाही म्हणून 75 टक्के स्त्रियांना नैराश्य; प्लास्टिक सर्जरीचा पर्याय अवलंबण्याची तयारी)

हा फोटो पोस्ट केल्यानंतर लगेच लोकांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हा फोटो डीलिट केला आहे. एकीकडे जवान आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देत आहेत, तर दुसरीकडे एका मंत्र्याकडून असे कृत्य घडलेले पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.