सोशल मीडियाचा जितका वापर वाढत आहे, तितकेच त्याचे तोटे समोर येत आहेत. त्यात सेल्फी या प्रकाराने तर लोकांना वेडे केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी चांगल्या सेल्फी याव्यात म्हणून आजकाल लोक आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घेताना दिसत आहेत. विश्वास ठेवायला थोडे कठीण आहे पण हे सत्य आहे. देशातील चार मोठ्या शहरांमध्ये एक सर्व्हे घेण्यात आला, यामध्ये 'Perfect Selfie Look' मिळावा म्हणून तरुणाई चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार असलेली दिसत आहे.
मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि हैद्राबाद अशा चार शहरांमधील 18 ते 40 वयोगटातील जवळजवळ 300 लोकांचा सर्व्हे घेण्यात आला. यामध्ये परफेक्ट सेल्फी मिळत नाही म्हणून 74 टक्के स्त्रियांचा तर 59 टक्के पुरुषांचा आत्मविश्वास खालावलेला असल्याचे दिसून आले. यामुळे 62 टक्के पुरुष तर 75 टक्के स्त्रिया चांगला सेल्फी येत नाही म्हणून प्लास्टिक सर्जरी करून घेण्यास तयार असलेले दिसून आले. मुंबईतल्या 63 टक्के पुरुष आणि 75 टक्के स्त्रियांमध्ये सुंदर नसल्याने नैराश्य आल्याचे दिसते.
दरम्यान सर्वात धक्कादायक म्हणजे, 16 ते 25 या वयोगटातील तरूण-तरुणी आठवड्यातील 5 तासांपर्यंतचा वेळ सेल्फी काढण्यात आणि ते पर्सनल प्रोफाइलवर अपलोड करण्यात घालवतात. मागच्या वर्षी पब्लिश झालेल्या एका अभ्यासातून 2011 ते 2017 या काळात सेल्फी घेण्याच्या नादात तब्बल 259 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये भारत हा पहिल्या नंबरवर असून, भारतात 159 लोकांनी सेल्फीच्या नादात आपले प्राण गमावले आहेत.