Small Saving Schemes Rate Hike: किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra), पोस्ट ऑफिस ठेव योजना (Post Office Deposit Schemes) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये (Senior Citizen Saving Schemes) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वित्त मंत्रालयाने (Finance Ministry) आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. तथापि, PPF, सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samridhi Yojana) आणि NSC वरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
किसान विकास पत्रावरील व्याजदर 6.9 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आला आहे. तर किसान विकास पत्रातील पूर्वीची गुंतवणूक 124 महिन्यांत परिपक्व होत असे. पण आता गुंतवणूक 123 महिन्यांतच परिपक्व होईल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.4 टक्क्यांवरून 7.6 टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न खाते योजनेवर 6.6 टक्क्यांऐवजी आता 6.7 टक्के व्याज मिळणार आहे. (हेही वाचा - LIC Home Loan: आता घर खरेदी करणं होणार महाग; कंपनीने वाढवले हाऊसिंग फायनान्सचे दर)
पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील व्याजदरात वाढ -
पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्क्यांऐवजी आता 5.7 टक्के व्याज मिळणार आहे. त्याच वेळी, 3 वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्क्यांऐवजी 5.8 टक्के व्याज दिले जाईल. 5.5 एक वर्षाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कोणताही बदल नाही. तसेच, पाच वर्षांच्या ठेव योजनेवर उपलब्ध असलेल्या 5.8 टक्के व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
पीपीएफ, सुकन्या योजनेवरील व्याजदरात वाढ नाही -
वित्त मंत्रालयाने मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) वर 7.1 टक्के, NSC म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 6.8 टक्के, सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के आणि पोस्ट ऑफिस बचत ठेव खात्यावरील 4 टक्के व्याजदरातही कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे 5 वर्षांच्या आवर्ती ठेवीवरही 5.8 टक्के व्याज कायम ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, 2020-21 च्या पहिल्या तिमाहीपासून आतापर्यंत 10 तिमाहींमध्ये लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आरबीआयने रेपो दरात तीन वेळा वाढ केल्यानंतर आणि रोख्यांवर उत्पन्न वाढवल्यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.