Rs 2000 Note Withdrawn: आजपासून बॅंकेमध्ये 2000 च्या नोटा बदलून मिळणार; बॅंकेमध्ये जाण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी!
2000 Rs Notes

आरबीआय (RBI) कडून 2000 च्या नोटा चलनामधून मागे घेण्याचा निर्णय 19 मे 2023 च्या दिवशी जाहीर करण्यात आल्यानंतर आता आज 23 मे पासून नागरिकांना नोटा बॅंकेमध्ये बदलून मिळणार आहेत. गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी नागरिकांना आवाहन करताना नोटा बदलून घेण्यासाठी घाई आणि गर्दी करू नका असं म्हटलं आहे. दरम्यान बॅंकांनाही सध्या उन्हाचे दिवस लक्षात घेता नोटा बदलून घेण्यासाठी येणार्‍यांची पुरेशी सोय करण्याची, पाण्याची व्यवस्था करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 2000 च्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर करतानाच आरबीआय ने या नोटा वैध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे नोटा व्यवहारामध्ये कायम ठेवल्या जाणार आहेत. पण वेळेचं बंधन न घातल्यास ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसल्याचं आरबीआय ने म्हटलं आहे.

  • 2000 च्या नोटा बदलण्याची मुदत काय?

2000 च्या नोटा बदलण्यासाठी आज 23 मे पासून 30 सप्टेंबरचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे 4 महिन्यात कधीही नागरिक नजिकच्या बॅंकेमध्ये जाऊन 2000 ची नोट बदलून घेऊ शकतात.

एकावेळी किती नोटा बदलता येणार ?

एकावेळी 2000 च्या 10 नोटा बदलता येणार आहेत. म्हणजेच 20 हजारांची रक्कम बॅंकेत एकावेळी बदलता येईल.

2000 च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रं

बॅंकेमध्ये 2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी कोणतीही स्लिप अथवा आयडी ची गरज नसेल. मात्र 50 हजारांवरील ठेवीसाठी 2000 च्या नोटा बदलून घेणार असाल तर मात्र पॅन कार्ड आवश्यक आहे.

कोणत्या बॅंकांमध्ये नोटा बदलून घेता येणार?

ग्राहकांना कोणत्याही नजिकच्या बॅंकेमध्ये नोटा बदलून मिळणार आहेत. त्यासाठी तुमचे त्या विशिष्ट बॅंकेमध्ये खातं असणं देखील आवश्यक नाही. How To Exchange Rs 2000 Notes: जाणून घ्या 2000 च्या नोटा बँकेतून कशा बदलून घेऊ शकता, मर्यादा आणि अंतिम मुदतही .

बॅंकेने नोट बदलून देण्यास नकार दिल्यास काय कराल?

बॅंकेने नोट बदलून देण्यास नकार दिल्यास त्याची रितसर तक्रार करण्याची सोय आहे. आरबीआयकडे तुम्ही संबंधित गोष्टीची तक्रार करू शकता.