EPF | (Photo Credits: PTI)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करणे आणि बँक खात्यांना आधारशी जोडण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढविली आहे. ही मुदत यापूर्वीही अनेक वेळा वाढविण्यात आली होती. या प्रक्रियेचा उद्देश कर्मचार्‍यांना ईपीएफओच्या रोजगार संलग्न प्रोत्साहन (ELI) योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यास सक्षम करणे आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 अंतर्गत रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजनेचे फायदे मिळविण्यासाठी, सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला सदस्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यांचे युएएन लवकरच सक्रिय करण्याचे निर्देश दिले होते.

ELI योजना काय आहे?

ELI योजना 2024 मध्ये पहिल्यांदा रोजगार मिळवणाऱ्या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत, पात्र कर्मचार्‍यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात अनुदान दिले जाते. युएएन सक्रिय करणे आणि बँक खात्यांना आधारशी जोडणे या प्रक्रियेचा एक भाग आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पात सादर केलेल्या इएलआय योजनेअंतर्गत, सरकारने एका वर्षात 2 कोटी नोकऱ्या देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या नोकऱ्या औपचारिक क्षेत्रात दिल्या जाणार आहेत.

जाणून घ्या युएएन म्हणजे काय-

ईपीएफओ त्यांच्या सदस्यांना 12 अंकी युएएन जारी करते. संस्थेच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी या क्रमांकाचे सक्रियकरण आवश्यक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खाते व्यवस्थापित करणे, पासबुक पाहणे, पैसे काढण्यासाठी आणि आगाऊ रक्कम जमा करण्यासाठी दावा दाखल करणे आणि दाव्यांचा मागोवा घेणे यासारख्या ईपीएफओच्या डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल.

युएएन सक्रिय करण्याची प्रक्रिया-

ईपीएफओच्या सदस्य पोर्टलला भेट द्या.

‘Activate UAN’ या पर्यायावर क्लिक करा.

आपला युएएन, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.

तपशीलांची पडताळणी करा आणि आधार ओटीपी पडताळणीसाठी सहमती द्या.

‘Get Authorisation PIN’ वर क्लिक करा आणि ओटीपी प्राप्त करा.

ओटीपी प्रविष्ट करून सबमिट करा.

यशस्वी सक्रियतेनंतर, आपल्याला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पासवर्ड प्राप्त होईल.

दरम्यान, ईपीएफओने सर्व नियोक्त्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांचे युएएन सक्रिय करणे आणि बँक खात्यांना आधारशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ते इएलआय योजनेचे लाभ घेऊ शकतील.