गुरुवारपासून मुंबईत (Mumbai) दुचाकीस्वार (Two-Wheeler Riders) आणि गाडीवर मागे बसलेली व्यक्ती अशा दोघांनाही हेल्मेट (Helmet) सक्तीचे असेल. या नियमाचे उल्लंघन केल्यास उद्यापासून वाहतूक पोलीस कोणताही इशारा देणार नाहीत आणि तातडीने कडक कारवाई केली जाईल. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. सर्व 50 वाहतूक पोलीस चोक्या हेल्मेट नसणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत सतर्क राहतील, असेही अधिकाऱ्याने सांगितले. 25 मे रोजी, मुंबई वाहतूक पोलिसांनी एक अधिसूचना जारी करून दुचाकीवर मागे बसलेल्या लोकांना हेल्मेट अनिवार्य केले होते.
पोलिसांनी लोकांना आदेशांचे पालन करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. पोलीस उपायुक्त (वाहतूक) राजतिलक रोशन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी काही दिवस आधीच हा नियम जाहीर करून बफर टाइम दिला आहे, त्यामुळे यापुढे कोणतेही इशारे नाहीत. गुरूवारपासून दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट न घातल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित होऊ शकतो आणि त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकेल. लोकांनी या नियमाचा विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा उपयोग नाही कारण हा कायदा सर्वांसाठी समान रीतीने लागू केलेला आहे. या नियमाचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीही सोमवारी मुंबईकरांना हेल्मेटबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: E-rickshaws in Matheran: ई-रिक्षा चाचणीसाठी माथेरान पालिकेला राज्य सरकारचे आदेश)
दरम्यान, संजय पांडे यांच्या संकल्पनेतून मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात तब्बल 40,320 वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली आहे.