Web Check In : फक्त या गोष्टीसाठी आकारले जाणार अतिरिक्त शुल्क, इंडिगोकडून स्पष्टीकरण
इंडिगो एअरलाइन (Photo Credit-File Photo)

Web Check In : एअरपोर्टवर चेकइनच्या रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये म्हणून वेब चेक इनची सुरुवात झाली. मात्र आतापर्यंत मोफत असणाऱ्या या सुविधेसाठी विमानकंपन्या अतिरिक्त शुल्क आकारू लागल्या. एअरपोर्टवर ही सेवा मोफत असतानाही, इंडिगो (IndiGo)कडून 100 रुपये आणि स्पाईसजेट (SpiceJet) कडून 99 रुपये फी वेब चेक इनसाठी आकारली जाणार असल्याची घोषण या विमान कंपन्यांनी केली होती. मात्र या निर्णयाविरुद्ध सोशल मीडियामधून अनेक प्रतिक्रिया आल्यानंतर इंडिगोने आता माघार घेतली आहे, तसेच या संदर्भातील आपले स्पष्टीकरणही दिले आहे.

कंपनी अशाप्रकारच्या सेवांना शुल्क आकारून आपले उत्पन्न वाढवत आहे. बॅगेज फी, सीट सिलेक्शन फी आणि कॅन्सलेशन फीचा देखील यामध्ये समावेश आहे. आता वेब चेक इनसाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितल्याने, प्रवाशांनी कंपनीवर टीका करण्यास सुरुवात केली होती. यासंदर्भात विमान मंत्रालयाकडूनही ट्विट करण्यात आले होते. मंत्रालय या प्रकरणाची आणि अशाप्रकारे अतिरिक्त पैसे आकारणे हे नियमांनुसार आहे की नाही या गोष्टीची चौकशी करणार असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले गेले होते. मात्र आता या मुद्द्यावर इंडिगोने आपले स्पष्टीकरण दिले आहे. ‘विमान प्रवासादरम्यान वेब चेक इनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, फक्त आवडीचे आसन निवडायचे असेल तर  किमान 100 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.’ असे कंपनीने म्हटले आहे. तसेच प्रवासी वेब चेक इन करताना कोणतेही मोफत आसन आरक्षित करु शकतात, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. असेही इंडिगोने म्हटले आहे.

यावरुन, भारतीय रेल्वेनेही विमान कंपन्यांवर निशाणा साधला होता. वेब चेक इनसाठी अतिरिक्त पैसे देण्याची किंवा विमानतळावर चेक-इन करताना मोठमोठ्या रांगांमध्ये उभं राहण्याची काय गरज. त्यापेक्षा स्वस्त आणि मस्त भारतीय रेल्वेनेच प्रवास करा असा सल्ला पश्चिम रेल्वेने दिला आहे.