प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

मोदी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी पहिल्यांदा बेरोजगारी हटवण्याचे कार्य हाती घेतले. यासाठी मेक इन ईंडिया’ सारख्या प्रकल्पही सुरु केला, गेल्या काही महिन्यांत लाखो लोकांना रोजगार प्राप्त झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र आता एका अहवालातून भारतातील बेरोजगारीमध्ये वाढ (Unemployment Rate) झाल्याचे समोर आले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) या संस्थेने बेरोजगारीसंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात फेब्रुवारीमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढून 7.2 टक्के झाला असल्याचे सांगितले आहे. मागील वर्षी हाच दर 5.9 टक्के एवढा होता.

याबाबत CMIE चे मुख्य महेश व्यास यांनी सांगितले की, ‘नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची संख्या घटली असून बेरोजगारीच्या दरात वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात नोकरी करणाऱ्या लोकांची संख्या 40 कोटी आहे तर वर्षभरापूर्वी 40.6 कोटी लोक नोकरी करत होते.’ हा अहवाल 10 हजार कोटी घरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून मांडण्यात आला आहे. नोटबंदी आणि जीएसटी लागू झाल्याने साधारण 1.1 कोटी जणांच्या हातून नोकऱ्या गेल्याचे CMIE च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा: नोटाबंदीने हिसाकावल्या जनतेच्या नोकऱ्या, गेल्या 45 वर्षात पहिल्यांदा भारतात बेरोजगारीचे वातावरण)

सरकार नेहमीच बेरोजगार कमी झाला असल्याचे सांगत आली आहे, मात्र CMIE चा हा अहवाल सरकारी अहवालापेक्षा विश्वसनीय असल्याचे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये लोकसभा निवडणुकीला सुरुवात होईल, या पार्श्वभूमीवर मोदी सरकारसाठी हा अहवाल तापदायक ठरू शकतो.