भयानक! शिकाऱ्याने नाही तर चक्क वाघानेच केली वाघिणीची शिकार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) कान्हा नॅशनल पार्क (Kanha National Park) येथे एक थक्क करणारी घटना घडली आहे. या पार्कमधील वाघिणीची शिकार कोणत्या व्यक्तीने नाही तर चक्क वाघानेच केली असल्याचे समोर आले आहे. वाघाने केलेली वाघिणीची शिकार ही एक दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमधील भांडणामुळे वाघाने वाघिणीची शिकार करुन खाल्ल्याचे सांगितले जात आहे.

शनिवारी कान्हा नॅशनल पार्क येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वाघिणीच्या शरिराचे लचके तोडून फेकल्याचे आढळून आले. तसेच आजूबाजूच्या परिसरात वाघिणीची खाल्लेली हाडे सापडली आहेत. वाघिणीचा मृतदेह पाहून तिला क्रूरपणे मारुन खाण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच चावा घेतलेल्या निशाण्यांवरुन वाघाने भूक संपवण्यासाठी नाही तर संतप्त झाल्याने वाघिणाला मारले आहे. प्राथमिक स्वरुपात वाघिणीवर वाघाने हल्ला केल्याचे सांगितले जात होते. मात्र शवविच्छेदनानंतर पूर्ण घटनेचा खुलासा करण्यात आला आहे. (हेही वाचा-पुणे येथे बिबट्याची क्रूर शिकार,आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या)

विशेषज्ञांनी सांगितले की, नॅशनल पार्क येथे वाघांची भांडणे होणे ही साधी गोष्ट आहे. तसेच वाघांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र एका वयस्कर वाघाने वयस्कर वाघिणीला खाणे ही एक गंभीर बाब असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. गेल्या 6 वर्षामध्ये मध्य प्रदेशात 105 वाघांचा मृत्यू झाला असून त्यातील 39 वाघ हे एकमेकांच्या मारामारीमुळे मृत पावले आहेत.