Photo Credit- X

Google Map Mislead: दिल्लीहून नेपाळला (Nepal) जाणारे दोन फ्रेंच नागरिक( French Tourists) बरेलीमध्ये रस्ता चुकल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही गुगल मॅपच्या (Google Map) मदतीने सायकलवरून प्रवास करत होते. दोघेही बरेलीतील (Bareilly) धरणाच्या काठावर पोहोचले. या दरम्यान, ते रस्ता चुकले. गावकऱ्यांना ही घटना लक्षात येताच त्यांनी दोघांनाही पोलिसांकडे नेले. पोलिसांनी दोघांनाही सुरक्षित ठिकाणी थांबवले आणि सकाळी योग्य मार्गाने नेपाळला पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार,ब्रायन जॅक गिल्बर्ट आणि सेबॅस्टियन फ्रँकोइस गॅब्रिएल अशी फ्रेंच पर्यटकांची नाव आहेत. 7 जानेवारी रोजी ते विमानाने दिल्लीत आले. ते दोघे पिलीभीतहून टनकपूरमार्गे काठमांडूला सायकलने जात होते. दोघांनीही गुगल मॅप्सची मदत घेतली आणि प्रवासाला सुरुवात केली. गुगल मॅप्सच्या मदतीने जात असताना दोघेही अंधारात रस्ता चुकले आणि चुरैली धरणावर पोहोचले.

ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. बहेरी सर्कल ऑफिसर अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनी दोन्ही पर्यटकांना एका निर्जन रस्त्यावर सायकल चालवताना पाहिले. ते परदेशी भाषा बोलत होते आणि स्थानिक लोकांना ते समजत नव्हते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावकऱ्यांनी त्याला चुरैली पोलिस ठाण्यात नेले.

पोलिसांनी दोन्ही फ्रेंच पर्यटकांना गावप्रमुखाच्या घरी राहण्याची व्यवस्था केली. यानंतर, शुक्रवारी सकाळी त्यांना योग्य दिशा आणि मार्गाची माहिती देण्यात आली आणि त्यांच्या गंतव्यस्थानाकडे नेपाळला रवाना करण्यात आले. (Google Maps Misleads Again: गुगल मॅपकडून पुन्हा झाली चूक; बांधकामाधीन महामार्गावर कारचा अपघात; एअरबॅग्जमुळे वाचला जीव (Watch Video))

या मदतीबद्दल फ्रेंच पर्यटकांनी पोलिस आणि ग्रामस्थांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि आवश्यक माहिती दिली. बरेली पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल 'X' वर हा फोटो शेअर केला आणि लिहिले- दिल्लीहून नेपाळला सायकलने जाणारे दोन फ्रेंच नागरिक हरवल्याची माहिती मिळताच, बहेरी पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. त्यांना योग्य दिशा दिल्यानंतर, त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानाकडे सुरक्षितपणे पाठवण्यात आले.