भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक आगळावेगळा प्रयोग चेन्नई इथे होणार आहे. भारतातील पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन 29 ऑक्टोबरला रुळावर परिक्षणासाठी येणार आहे. ही ट्रेन शताब्दी एक्सप्रेसची जागा घेणार आहे. ट्रेन18 असे नाव असलेली ही ट्रेन सेल्फ प्रपल्शन मॉड्यूलवर 160 किमी प्रती किमी वेगाने जाऊ शकते. तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे या ट्रेनचा वेग इतर ट्रेनपेक्षा जास्त आहे.
आता शताब्दी एक्स्प्रेस ऐवजी, केवळ 18 महिन्यांत तयार झालेली ही ट्रेन18 धावणार आहे. शताब्दी 1988 मध्ये आली होती आणि सध्या ती 20 मार्गांवर धावत आहे. आता या मार्गांवर ही ट्रेन18 धावणार आहे.
या ट्रेनला एकूण 16 डबे असतील. चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ)मध्ये ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टद्वारा 'ट्रेन18' ची निर्मिती करण्यात आली आहे. या ट्रेनची प्रतिकृती बनवण्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
ट्रेनमध्ये 'एक्झिक्युटीव्ह' आणि 'नॉन एक्झिक्युटीव्ह' असे दोन कोच आहेत. एक्झिक्युटीव्ह चेअर क्लासमध्ये 56 यात्री बसण्याची क्षमता आहे. तर नॉन एक्झिक्युटीव्हमध्ये 78 जणांसाठी बसण्याची आसनव्यवस्था आहे. ही ट्रेन पूर्णपाणे वातानुकूलित असून त्यामध्ये वाय फायचीदेखील सोय आहे.
ट्रेनमध्ये मॉड्युलर टॉयलेटची सोय आहे. दिव्यांगांसाठी ट्रेनमध्ये खास सुविधा आहे. व्हिलचेअरही उपलब्ध असल्याने ट्रेनमध्ये फिरणं सुकर होणार आहे. ट्रेन 18मध्ये जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत
शताब्दी ट्रेनचा वेग 130 किमी प्रती तास आहे. तर ही ट्रेन 160 किमी प्रती तासाच्या वेगानं धावेल. त्यामुळे या ट्रेनच्या प्रवासामुळे प्रवाश्यांचा 20 टक्के वेळ वाचणार आहे.