आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचे भूत सरकारच्या डोक्यावर सवार; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची टीका
Ex-PM Manmohan Singh |

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बँकांची हालत वाईट होण्यास जबाबदार धरल्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Ex-PM Manmohan Singh) यांनी केंद्र सरकारवर जोरदार पलटवार केला आहे. आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारण्याचे भूत सरकारच्या डोक्यावर सवर असल्याचे जोरदार टीकास्त्र मनमोहन सिंह यांनी सोडले आहे. अर्थव्यवस्थेत आलेली मंदिसदृश्य स्थिती (Economic Slowdown), या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी असलेली सरकारची उदासीनता यावर मनमोहन सिंह यांनी सांगितले की, सरकारच्या उदासीनतेचा परिणाम भारतीयांच्या भविष्यावर आणि आशाआकांक्षावर पडणार आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळेही अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. आयोजित पत्रकार परिषदेत मनमोहन सिंह बोलत होते.

मनमोहन सिंह यांनी महाराष्ट्राचा खास उल्लेख करत म्हटले की, महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसायात मोठी घट निर्माण झाली असून, अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत. काही ठिकाणी कर्मचारी कपात सुरु आहे. निर्माण झालेल्या स्थितीवर काही उपाययोजना करण्याऐवजी भाजप सरकार केवळ विरोधी पक्षांवर टीका करत आहे. टीका करण्याने समस्या सुटणार नाहीत, असा टोलाही मनमोहन सिंह यांनी लगावला.

दरम्यान, मनमोहन सिंह यांना NRC च्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, आम्ही NRCच्या विरोधात नाही. परंतू आम्ही मानवता दृष्टीकोन ध्यानात घेऊ इच्छितो. कलम 370 लाही काँग्रेसने संसदेत पाठिंबाच दिला होता. जम्मू-कश्मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही मनमोहन सिंह म्हणाले.

एएनआय ट्विट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक बँकांची आर्थिक स्थिती चिंताजनक होण्यास माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि रिजर्व्ह बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन जबाबदरा असल्याचे म्हटले होते. सीतारमण यांनी म्हटले होते की, मनमोहन सिह आणि रघुराम राजन यांचा कार्यकाळ सरकारी बँकांसाठी 'सर्वात वाईट काळ' होता. सीतारमण यांनी कोलंबिया यूनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनेशनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स मध्ये एक व्याख्यान दिले होते. या व्याख्यानात सीतारमण यांनी म्हटले होते की, सार्वजनिक बँकांना नवसंजिवनी देणे हे माझे आद्यकर्तव्य आहे. रघुराम राजन हे एक महान विद्वान आहेत. मी त्यांचा आदर करते त्यांना त्या काळात केंद्रीय बँकेत घेतले गेले जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत होती.