Apache Helicopter Emergency Landing (PC - Twitter/@Nai_Dunia)

Apache Helicopter Emergency Landing: मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील जखनौली भागात हवाई दलाच्या अपाचे हेलिकॉप्टरचे (Apache Helicopter) इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर शेतात उतरवण्यात आले आहे. विमानातील पायलट आणि सैनिक पूर्णपणे सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर शेतात उतरताच आजूबाजूचे लोक जमा झाले. यासोबतच प्रशासनाचे पथकही बंदोबस्तासाठी घटनास्थळी पोहोचत आहे.

हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेले सैनिक आणि पायलट यांनी तांत्रिक बिघाडासंदर्भात जास्त माहिती दिली नाही. त्यामुळे नेमकी हेलिकॉप्टमध्ये कोणता बिघाड झाला हे अद्याप समजू शकलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी भिंडच्या जखनौली गावातील शेतात अपाचे हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत उतरताना ग्रामस्थांना दिसले. काही वेळातच हेलिकॉप्टर गावाजवळच्या शेतात उतरलं. हे पाहून गावकरी विमानाभोवती जमा झाले. (हेही वाचा -GSLV-F12 आणि NVS-01 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, पाहा व्हिडिओ (Watch Video))

विमानाच्या सुरक्षित लँडिंगमुळे हेलिकॉप्टरचे किंवा सैनिकांचे कोणतेही नुकसान झाले नाही. हवाई दलाच्या मुख्यालयातही ही माहिती देण्यात आली असून बचाव आणि तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचत आहे.

अपाचे हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये -

हवाई दलाच्या लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे मध्ये शत्रूची संरक्षण यंत्रणा क्षणार्धात नष्ट करण्याची क्षमता आहे. या लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये अनेक क्षेपणास्त्रे आणि स्वयंचलित एअर गनही बसवण्यात आल्या आहेत. 16 AGM 114 अँटी-टँक गाइडेड क्षेपणास्त्रे देखील अपाचेमध्ये स्थापित करण्यात आली आहेत, जे हवेपासून 600 किमी दूर असलेल्या शत्रूच्या लक्ष्यांना नष्ट करू शकतात.