युपीएससी (UPSC) कडून 2021-22 मध्ये होणार्या परीक्षांचे रिव्हाईज्ड एक्झाम कॅलेंडर (UPSC Revised Calendar) जारी केले आहे. दरम्यान देशामधील मागील दीड वर्षांपासून घोंघावणार्या कोरोना वायरस संकटामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत तर काही लांबणीवर पडल्या आहेत. पण आता देशात कोरोना लसीकरणाला वेग आल्यानंतर स्थिती पुन्हा सामान्य करण्याचा प्रयत्न होत असताना यूपीएससी कडूनही स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा आता पुन्हा नव्या वेळापत्रकानुसार घेण्याची तयारी सुरू झाली आहे. upsc.gov.in या अधिकृत वेबसाईट वर हे वेळापत्रक जारी केले असून तुम्ही तेथून डाऊनलोड देखील करू शकता. UPSC IES Prelims 2021 Timetable Released: भारतीय इंजिनियरिंग सर्व्हिस परीक्षेचं यंदाचं वेळापत्रक upsc.gov.in वर जारी.
यूपीएससी च्या नव्या वेळापत्रकानुसार, यूपीएससी ईपीएफओ परीक्षा आता 5 सप्टेंबर 2021 ला आयोजित करण्यात आली आहे. तर सीएपीएफ परीक्षा 8 ऑगस्ट आणि एनडीए II परीक्षा 14 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. एनडीए ची परीक्षा यापूर्वी 5 सप्टेंबरला होणार होती. कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस ची प्रारंभिक परीक्षा आता नव्या वेळापत्रकानुसार 21 नोव्हेंबरला होणार आहे.
युपीएससी ची सिव्हिल सर्व्हिस प्रारंभिक परीक्षा 2021 आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार आहे. यापूर्वी या परीक्षा 27 जूनला होणार होत्या. तर सिव्हिल सर्व्हिस मुख्य परीक्षा 7 जानेवारी 2022 ला सुरू होणार आहे. ही परीक्षा 7,8,9,15 आणि 16 जानेवारी 2022 ला होणार आहे. याप्रमाणेच इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा 27 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार असून 8 मार्च पर्यंत चालणार आहे. इथे पहा आणि डाऊनलोड करा नवं वेळापत्रक .
दरम्यान युपीएससी कडून 2020 वर्षाच्या देखील अनेक परीक्षा प्रलंबित आहेत. यामध्ये सिव्हिल सर्व्हिस मधील मुलाखती 2 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2021 पर्यंत घेतल्या जाणार आहेत. कोरोना संकटामुळे विस्कळीत झालेल्या सार्याच शैक्षणिक वर्षांना पुन्हा रूळावर आणण्यासाठी हे नवं वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.