इंटरनॅशनल रँकिंग एजन्सीने क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 (QS Asia University Rankings 2023) जारी केले आहे. यानुसार भारतातील 19 शीर्ष संस्थांना टॉप 200 च्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) आघाडीवर आहे, जे या यादीत 40 व्या आणि आयआयटी दिल्ली 46 व्या स्थानावर आहे. या यादीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इतर वर्षांच्या तुलनेत क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगच्या यादीत यावर्षी अधिक संख्येने भारतीय विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी आयआयटी दिल्ली आपल्या जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत संस्थेचा एक दर्जा घसरला आहे. असे असूनही, आयआयटी दिल्ली अजूनही देशातील दुसरी सर्वोत्तम संस्था आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूला या जागतिक क्रमवारीत 52 वे स्थान मिळाले आहे. यानंतर आयआयटी मद्रास या क्रमवारीत 53 व्या स्थानावर आहे. या क्रमवारीत, आयआयटी खरगपूर 61 व्या, तर आयआयटी कानपूर 66 व्या क्रमांकावर आहे व आयआयटी रुरकी 114 व्या क्रमांकावर आहे. भारतातील विविध आयआयटी संस्थांनी क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये चांगली कामगिरी केली आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) क्रमवारीत 119 व्या स्थानावर आहे, तर आयआयटी गुवाहाटी 124 व्या आणि व्हिआयटी वेल्लोर 173 व्या स्थानावर आहे. जामिया मिलिया इस्लामिया संस्था शीर्ष 200 मध्ये 188 व्या स्थानावर आहे. यापूर्वी ऑक्टोबरच्या अखेरीस प्रसिद्ध झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी सस्टेनेबिलिटी रँकिंगमध्ये, आयआयटी बॉम्बेची भारतातील सर्वोच्च उच्च शैक्षणिक संस्था म्हणून निवड झाली आहे. याशिवाय आयआयटी बॉम्बेचा जगातील टॉप 100 रोजगार देणाऱ्या संस्थांमध्ये समावेश करण्यात आला आहे. (हेही वाचा: Engineering Books in Marathi: आता अभियांत्रिकी अभ्यासक्रम मराठीमध्ये; महाराष्ट्र राज्य 14 नोव्हेंबरला लाँच करणार पुस्तके)
दरम्यान, क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2023 मध्ये चीनच्या पेकिंग विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, सिंघुआ युनिव्हर्सिटी- बीजिंग, युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी- सिंगापूर, फुदान युनिव्हर्सिटी- चीन, झेजियांग युनिव्हर्सिटी- चीन, कोरिया अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ मलाया- क्वालालंपूर, शांघाय जिओ टोंग विद्यापीठ यांचा समावेश आहे.