PM Yasasvi Scholarship: भारत सरकारतर्फे 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती; अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या सविस्तर
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

भारत सरकारने इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम आणला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने व्हायब्रंट इंडियासाठी पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम (YASASVI Scholarship Scheme) साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. या योजनेअंतर्गत OBC, EBC, नॉन-नोटिफाइड, भटक्या, अर्ध भटक्या जमातीमधील इयत्ता 9वी ते 12वीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृती दिली जाते. या योजनेअंतर्गत ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही, अशाच मुलांना शिष्यवृती दिली जाते.

ज्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार या कार्यक्रमासाठी 26 ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी दुरुस्ती विंडो 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान खुली असेल. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे, त्यांच्यासाठी NTA 5 सप्टेंबर 2022 रोजी अधिकृत वेबसाइटवर प्रवेशपत्र जारी करेल.

योजनेअंतर्गत इयत्ता 9वी ते 12वीच्या 15000 शालेय विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत 9वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना वर्षाला 75,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, तर इयत्ता 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 125,000 रुपये दिले जातील.

पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम परीक्षा 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही परीक्षा तीन तासांची असेल आणि संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेत MCQ प्रश्न असतील. देशभरातील 78 शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले जातील. स्कॉलरशिपसाठी ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील उमेदवारांच्या निवडीसाठी यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप परीक्षा घेतली जात आहे. (हेही वाचा: अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मिळणार 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज; जाणून पात्रता व कुठे कराल अर्ज)

NTA ने YASASVI 2022 चा अभ्यासक्रम देखील जारी केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाइटवर अभ्यासक्रम पाहू शकतात. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, उमेदवार NTA हेल्प डेस्कला 011 4075 9000 किंवा 011 6922 7700 वर कॉल करू शकतात.