NCERT (Photo Credits: IANS | Twitter)

National Council of Educational Research and Training अर्थात NCERT कडून बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. आता उपलब्ध असणार्‍या पुस्तकामध्ये 'बाबरी मशिदी'(Babri Masjid) चा उल्लेख टाळण्यात आला आहे. त्याचा उल्लेख आता तीन घुमट रचना (Three-Domed Structure) असा करण्यात आला आहे. तसेच अयोद्धा वर आधारित भाग देखील 4 वरून 2 पानांचा करण्यात आला आहे.

प्रभू रामाच्या रथयात्रेचे वर्णन, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशीद विध्वंसानंतरची हिंसा आणि राष्ट्रपती राजवट लागू करणे यासह चार पानांचा आशय दोन पानांचा करण्यात आला आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अयोध्या वादाची माहिती देणारे जुने धडे देखील काढून टाकण्यात आले आहेत. यामध्ये गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या या भाजपच्या रथयात्रेचा समावेश होता. कारसेवकांची भूमिका, 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेला जातीय हिंसाचार, भाजपशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट, अयोध्येत घडलेल्या घटनांबद्दल भाजपने व्यक्त केलेली खंत यांचा समावेश आहे.

राज्यशास्त्राच्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीमध्ये अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एक भाग जोडण्यात आला आहे. पुस्तकात अयोध्या वादावर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या 5-0 निर्णयाचा उल्लेख आहे. त्या निर्णयामुळे मंदिर उभारणीचा मार्ग तयार झाला. तसेच 2024 मध्ये मंदिराचे उद्घाटन झाले आहे. असा उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान जुन्या पुस्तकामध्ये 7 डिसेंबर 1992 च्या लेखासह विध्वंसाच्या वेळी लिहिलेल्या वर्तमानपत्रातील लेखांची छायाचित्रे होती. ही छायाचित्र देखील आता हटवण्यात आली आहेत. 'अयोध्या हा भाजपचा सर्वात वाईट गैरसमज आहे.' असा अटल बिहारी वाजपेयी यांच्या वक्तव्याचा वृत्तपत्रातील लेखाच्या मथळ्याचा फोटो देखील हटवण्यात आला आहे.तसेच आता नव्या पुस्तकात वृत्तपत्रातील सर्व कात्रणे काढण्यात आली आहेत.