Amazon Academy: कोचिंग बिजनेसमध्ये Amazon India ची एन्ट्री; JEE आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली 'अ‍ॅमेझॉन अ‍ॅकॅडमी'
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेची (Joint Entrance Examination) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, अ‍ॅमेझॉन इंडियाने (Amazon India) अ‍ॅमेझॉन अ‍ॅकॅडमी (Amazon Academy) सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सामग्री, लाइव्ह लेक्चरद्वारे जेईईसाठी नियमित तयारी करवून घेतली जाईल. तसेच गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचे विस्तृत मूल्यांकन उपलब्ध करुन दिले जाईल. अ‍ॅमेझॉन अ‍ॅकॅडमीची बीटा आवृत्ती व्हीबँड आणि गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध असेल.

निवेदनात पुढे म्हटले आहे की अ‍ॅमेझॉन अ‍ॅकॅडमी विद्यार्थ्यांना जेईईच्या तयारीशी संबंधित संसाधने प्रदान करेल. त्यांना तज्ञांनी तयार केलेले 15,000 हून अधिक प्रश्न उत्तरांसह प्रदान केले जातील. ही सर्व शिक्षण सामग्री आणि परीक्षेची सामग्री देशभरातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी विकसित केली आहे. जेईईबरोबरच, BITSAT, VITEEE, SRMJEEE आणि MET तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या उपलब्ध कंटेंटचा फायदा होईल.

मॉक टेस्टमध्ये चॅप्टर टेस्ट, पार्ट टेस्ट आणि फुल टेस्ट समाविष्ट आहे, जे जेईई पॅटर्नचे अनुसरण करते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षेची तयारी करण्यास मदत मिळणार आहे. या चाचण्या खास जेईईची समज आणि अनुभव देण्यासाठी तयार केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे बारकावे समजण्यास मदत होते.

दुसरीकडे, ई-कॉमर्स दिग्गज आणि कंटेंट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनने बुधवारी भारतीय वापरकर्त्यांच्या लक्षात घेऊन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन लाँच केले. या योजनेत वापरकर्ते अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा आनंद दरमहा 89 रुपयांमध्ये घेऊ शकतील. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारख्या कंपन्यांशी चालू असलेल्या स्पर्धेदरम्यान अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने ही सेवा सुरू केली आहे. यासाठी अ‍ॅमेझॉनने एअरटेलशी करार केला आहे. (हेही वाचा: MPSC 2020 Exam Revised Dates: राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 यंदा 14 मार्च ला; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक)

या ऑफरचा लाभ एअरटेलचे प्रीपेड वापरकर्ते घेऊ शकतात. एअरटेल वापरकर्ते 30 दिवसांसाठी प्राइम व्हिडिओच्या विनामूल्य ट्रायलचा आनंद घेऊ शकतात. विनामूल्य सबस्क्रिप्शन मिळविण्यासाठी ग्राहकांना एअरटेल थँक्स अॅप वापरावे लागेल.