
सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT) एम टेक (M Tech) कोर्सच्या फीमध्ये दहापट, म्हणजे जवळजवळ 900% नी वाढ केली आहे. आता एमटेकची फी दर वर्षी 2 लाख रुपये असणार आहे. याबाबत रविवारी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले की, वाढीव फी केवळ नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लागू होईल. आधीपासूनच या अभ्यासक्रमात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना मिळत असणारी आर्थिक मदतही तशीच सुरू राहणार आहे.
मानव संसाधन विकास मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. फी वाढीमुळे आयआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल, जे हा अभ्यासक्रम गंभीरपणे घेत नाहीत किंवा हा कोर्स मधूनच सोडून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सुरू करतात. मात्र अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि इतर वर्गांना मिळणारी सवलत आणि शिष्यवृत्ती कायम राहणार आहे. वर्ष 2020 साठी ही नवीन फी लागू केली जाईल. (हेही वाचा: Agricopter: आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी शोधलं 'अॅग्रीकॉप्टर'; ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करुन पिकांवार ठेवणार बारीक नजर)
आयटीआय मधील फी वाढीस, एम टेकची फी बीटेक फीच्या पातळीवर आणण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्री पोखरियाल निशंक यांनी मान्यता दिली. तीन सदस्यांच्या समितीच्या शिफारशीनंतर हा निर्णय लागू करण्यात आला आहे. याशिवाय आयआयटी प्राध्यापकांमध्येही इव्हॉल्यूशन सिस्टम लागू केली जाणार आहे, ज्यात प्राध्यापकांची कामगिरी तपासली जाईल. यामध्ये समाधानकारक कामगिरी नसलेल्या प्राध्यापकांना काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.
तसेच जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत त्यांनादेखील तीन वर्षांनंतर कोर्समधून वगळण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना तीन वर्षांसाठी बीएससी इंजिनीअर ही पदवी दिली जाईल. सोबतच त्यांच्या मासिक फेलोशिपवाराही रोख लावली जाईल. दरम्यान, आयआयटी-मुंबईसाठी एमटेक 5,000 रुपये आहे, तर आयआयटी दिल्लीसाठी एका सेमीस्टरसाठी 10,000 फी आहे. आयआयटी-मद्रासमध्ये 5000 रुपये आहे. आयआयटी खडगपूरच्या पहिल्या सेमेस्टरसाठी फी 25,950 रुपये आहे, ज्यामधील 6000 रुपये तुम्हाला परत मिळतात. सध्या एकूण 23 आयआयटी संस्थांमध्ये 14 हजार विद्यार्थी एमटेकचे शिक्षण घेत आहेत.