Students | Representational Image | (Photo Credits: PTI)

Higher Education All India Survey Report: केंद्र सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षण विषयक अखिल भारतीय सर्वेक्षण 2020-21 चा अहवाल प्रकाशित केला आहे. 2011 पासून मंत्रालयाकडून, उच्च शिक्षण विषयक हे सर्वेक्षण जारी केले जात आहे. भारतातील सर्व उच्च शिक्षण संस्थामध्ये हे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांची पटसंख्या, शिक्षकांविषयी माहिती, पायाभूत सुविधाविषयक माहिती, आर्थिक माहिती इत्यादीविषयीची सविस्तर माहिती आणि आकडेवारी गोळा केली जाते.

पहिल्यांदाच, या अहवालासाठी 2020-21 साठी, उच्च शिक्षणसंस्थांनी संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने माहिती भरली आहे. वेब डेटा कॅप्चर फॉरमॅट (DCF) च्या माध्यमातून, हा ऑनलाईन डेटा भरण्यात आला असून, उच्च शिक्षण विभागाने राष्ट्रीय माहिती केंद्राच्या माध्यमातून हा फॉरमॅट विकसित केला आहे. (हेही वाचा - India Post Recruitment 2023: पोस्ट विभागात 40 हजार ग्रामीण डाक सेवकांची भरती; काय आहेत पात्रतेच्या अटी? जाणून घ्या)

विद्यार्थी पटसंख्या -

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी 2019-20 मध्ये 3.85 कोटी इतकी होती, ती आता 2020-21 मध्ये सुमारे 4.14 कोटी झाली आहे. 2014-15 पासून, या पटसंख्येमध्ये सुमारे 72 लाख विद्यार्थ्यांची (21%) वाढ झाली आहे. तसेच विद्यार्थिनींची पटसंख्या 2019-20 मध्ये 1.88 कोटींवरून 2.01 कोटी झाली आहे. 2014-15 पासून या पटसंख्येत सुमारे 44 लाख (28%) वाढ झाली आहे.

याशिवाय, वर्ष 2014-15 मध्ये एकूण पटसंख्येच्या 45% असलेली मुलींची संख्या 2020-21 मध्ये जवळपास 49% झाली आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्या गुणोत्तरात वर्ष 2019-20 च्या तुलनेत वर्ष 2020-21 मध्ये 1.9 बिंदूंची लक्षणीय वाढ झाली आहे. अनुसूचित जातींतील विद्यार्थ्यांची पटसंख्या 58.95 लाख आहे, जी 2019-20 मध्ये 56. 57 लाख होती आणि 2014-15 मध्ये 46.06 लाख होती.

तथापी, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या 2020-21 मध्ये वाढून 24.1 लाख झाली, जी 2019-20 मध्ये 21.6 होती आणि 2014-15 मध्ये 16.41 लाख होती. इतर मागासवर्गीय समूहातील विद्यार्थ्यांचे प्रवेश देखील 2020-21 मध्ये 6 लाखांनी वाढून 1.48 कोटी इतके झाले, जे 2019-20 मध्ये 1.42 कोटी इतके होते. वर्ष 2014-15 पासून इतर मागासवर्गीय समूहातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशात जवळपास 36 लाख (32%) इतकी लक्षणीय वाढ झाली आहे.

पटसंख्येत ही राज्य आघाडीवर -

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान ही सहा राज्ये विद्यार्थी पटनोंदणीत आघाडीवर आहेत. शासकीय विद्यापीठे (एकूण 59%) या पटनोंदणीत 73.1% योगदान देतात. तर, सरकारी महाविद्यालये (एकूण 21.4%) नोंदणीत 34.5% योगदान देतात. 2020-21 मध्ये उत्तीर्ण झालेल्यांची संख्या, 95.4 लाखांपर्यंत वाढली आहे. 2019-20 मध्ये ही संख्या, 94 लाख इतकी होती.