
Delhi High Court: जोडीदाराने जाणूनबुजून लैंगिक संबंधांना नकार देणे ही क्रूरता असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका जोडप्याच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. या जोडप्याचे लग्न केवळ 35 दिवस टिकले. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पत्नीचे अपील फेटाळून लावले. यावेळी उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, संबंधाशिवाय विवाह हा शाप आहे. लैंगिक निराशा लग्नासाठी अत्यंत धोकादायक स्थिती आहे.
या प्रकरणात पत्नीच्या विरोधामुळे विवाह पार पडला नाही, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने सांगितले की, महिलेने हुंड्यासाठी तिचा छळ केल्याची तक्रारही पोलिसांकडे केली होती, ज्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. न्यायालयाने म्हटले की यालाही क्रूरता म्हणता येईल. (हेही वाचा - Delhi High Court: घटस्फोटित मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क नाही; दिल्ली उच्च न्यायालयाची महिलेची याचिका फेटाळताना टिपण्णी)
महिलेने तिच्या सासरच्या घरी घालवलेल्या कालावधीचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले, सध्याच्या प्रकरणात, पक्षकारांमधील विवाह केवळ 35 दिवसच टिकला. तर वैवाहिक हक्कांपासून वंचित राहिल्यामुळे हा विवाह अयशस्वी झाला. 18 वर्षांहून अधिक काळ अशी परिस्थिती कायम राहणे म्हणजे मानसिक क्रूरतेसारखेच आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने सांगितले की या जोडप्याने 2004 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. पत्नी लग्नानंतर तिच्या पालकांच्या घरी परतली आणि परत आलीचं नाही.
तथापी, नंतर पतीने क्रूरतेचे कारण देत घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली, आपल्या आदेशात खंडपीठाने म्हटले आहे की कौटुंबिक न्यायालयाने योग्य निष्कर्ष” काढला आहे की पत्नीचे तिच्या पतीबद्दलचे वर्तन क्रूरतेचे होते. ज्यामुळे तिला घटस्फोट हवा होता.