Delhi State Election Commissioner Vijay Dev (PC - ANI)

Delhi MCD Election 2022 Date: दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation of Delhi) तारखा जाहीर झाल्या आहेत. दिल्लीचे निवडणूक आयुक्त (Delhi State Election Commissioner) विजय देव (Vijay Dev) यांनी सांगितले की, एमसीडीच्या 250 वॉर्डांमध्ये 68 विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची अधिसूचना 7 नोव्हेंबरला जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर असणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येईल. तर19 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येतील. दिल्लीची सेमीफायनल म्हटल्या जाणार्‍या MCD निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला मतदान होणार आहे. तसेच 7 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

दिल्ली निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, एकूण 250 जागांपैकी 42 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. त्यापैकी 21 जागा एससी समाजातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इतरांपैकी 104 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अशा प्रकारे महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. MCD निवडणुकीत 1.46 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यापैकी 213 मतदार हे 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. एकूण 13 हजार 665 मतदान केंद्रे बांधण्यात येणार आहेत. (हेही वाचा - Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये Isudan Gadhvi असतील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; केजरीवाल यांनी केली घोषणा)

दिल्ली निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, तारखांच्या घोषणेबरोबरच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड ​​स्पीकरवर बंदी असेल. निवडणुकीतील उमेदवारांची खर्च मर्यादा पूर्वी 5.57 लाख होती, ती वाढवून 8 लाख करण्यात आली आहे.