'तितली' चक्रीवादळाचा परिणाम ( Photo Credits:ANI)

'तितली' या चक्रीवादळाने गुरुवारी (११ ऑक्टोबर) ओडीसाला धडक दिली. ओडीसातील सुमारे १८ जिल्हे वादळाच्या प्रभावाखाली आले असून, नागरिकांना सतर्कता आणि अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनही सज्ज आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही ठिकाणांवरील सुमारे तीन लाख नागरीकांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. ओडिसा आणि आंध्र प्रदेश ही दोन्ही राज्ये 'तितली'च्या प्रभावाखाली आहेत. दरम्यान,  या वादळाचे भयावह रुप गोपाळपूर येथे गुरुवारी पाहायला मिळाले. वादळाचा तडाखा बसल्याने या परिसरातील विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली. किनारपट्टीलगतच्या भागात काही ठिकाणी वेगवान वारे तर, मुसळधार पाऊस सुरु आहे.

हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार, चक्रीवादळ सुमारे १६५ किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने धावत आहे. भारतीय हवामान विभागने (आयएमडी) बुधवारी सांगितले की, चक्रीवादळामुळे पर्यावरणात काही बदल होण्याची शक्यता आहे. खास करुन प्रतितास १६५ किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश आणि ओडीसा या दोन्ही राज्यांनी चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून सुमारे तीन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच, दोन्ही राज्यांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

ओडिसाच्या समुद्री किनारपट्टीवर वारे वेगाने वाहात आहे. या परिसरात 'तितली'चे वादळ ताशी १४० ते १५० किलोमीटर वेगाने वाहात आहे. ओडिसाच्या गोपाळपूर येथे वारे ताशी १०२ किलोमटीर वेगाने वाहात आहे. तर, आध्र प्रदेशातील कलिंगपट्टनम येथे हेच वारे प्रतितास ५६ किलोमीटर वेगाने वाहात आहे.

दरम्यान, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बुधवारी सांगितले की, सुमारे तीन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. गरज पडल्यास आणखी काही ठिकाणांवरील लोकांना स्थलांतरीत करण्यात येईल. लोकांनी घाबरुन जाऊ नये. सरकार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नैसर्गिर आपत्तीपासून नागरिकांचे नुकसान कसे कमीत कमी होईल यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे.